बुस्टर डोसलाही जुमानत नाही Omicron? तिसऱ्या डोसनंतरही दोघांना ओमायक्रॉनची लागण
बुस्टर डोस देण्यात यावा अशी चर्चा असतानाच या बातमीने चिंता वाढली आहे.
सिंगापूर : बुस्टर डोस घेतल्यानंतर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंगापूरमध्ये विमानतळावरील चाचणी दरम्यान 24 वर्षीय मुलीच्या प्राथमिक अहवालात ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर 6 डिसेंबरला जर्मनीहून आलेला एक प्रवासी ओमायक्रॉन बाधित आढळला. धक्कादायक म्हणजे या दोघांनीही कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस घेतला होता.
ओमायक्रॉनची लक्षणे आढळल्यानंतर दोन्ही संक्रमितांना राष्ट्रीय संसर्गजन्य आरोग केंद्रात ठेवण्यात आलं आहे, जिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, अशी माहिती सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसंच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना 10 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
तिसऱ्या डोसची आवश्यकता?
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी तिसऱ्या डोसची आवश्यकता भासेल असं, लस निर्माते फायझर आणि बायोटेक यांनी प्राथमिक अभ्यासाच्या निकालांच्या आधारे दावा केला आहे. कोरोना लसीचा तिसरा डोस घेणारे लोक दोन डोस घेत असलेल्या लोकांपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त ओमायक्रॉनचा धोका टाळू शकतात, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.
सिंगापूर हा जगातील सर्वोत्तम लसीकरण मोहिम राबवलेल्या देशांपैकी एक आहे. सिंगापूरमध्ये 87 टक्के लोकांचं पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं आहे. त्याच वेळी, सुमारे 29 टक्के लोकांना बूस्टर डोस देखील दिला गेला आहे. सरकार लवकरच 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचा डोस सुरू करणार आहे.