नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या रिमांडबाबत पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणीसाठी नीरव मोदीला हजर करण्यात आलं. यावेळी, नीरवला भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यास त्याला कोणत्या तुरुंगात ठेवलं जाणार? असा प्रश्न ब्रिटनच्या न्यायालयानं विचारलाय. तसंच याबाबत १४ दिवसांच्या आत माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने भारत सरकारला दिले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नीरव मोदीला वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे नीरव मोदीची सुनावणी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरव मोदीला ३० मे रोजी चौथ्यांदा ब्रिटनच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पुन्हा एकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तसंच त्याच्या न्यायालयीन कोठडी २७ जूनपर्यंत वाढ करण्यात आलीय. २७ जून रोजीच पुढची सुनावणी होणार आहे. नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्डसवर्थ तुरुंगात कैद आहे. लंडनच्या मेट्रो बँकेतून त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी १९ मार्च रोजी मोदी एक नवं बँक अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न करत होता. 

नीरव मोदी याच्यापूर्वी विजय माल्याच्या प्रकरणातही न्यायाधीश एम्मा अर्बुथनॉट यांनीच त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी माल्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय सुनावला होता. तेव्हाही भारतीय चौकशी यंत्रणेनं आर्थर रोडच्या तुरुंगाचा व्हिडिओ दाखवत इथे माल्याला ठेवण्यात येईल, असं सांगितलं होतं.