जालियनवाला बाग गोळीबार प्रकरणी इंग्लंड माफी मागणार नाही
लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालीयनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.
लंडन : लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालियनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे. जालियनवाला बागमध्ये ब्रिटीशांनी जो गोळीबार केला त्यात शेकडे लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे इंग्लंडने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी सादिक खान यांनी केली होती.
माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांच्या विधानाचा पुनरूच्चार
दरम्यान, सादीक खान यांच्या मागणीला इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने नकार देत माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी चार वर्षांपूर्वी केलेल्या विधानाचा पुनरूच्चार केला. 'द इंडिपेडेंट' न्यूजने साईटने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी 2013मध्ये जालियनवाला बागचा दौरा केला होता. या वेळी ही घटना इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी आणि तितकीच क्रूर घटना होती. जी कधीही विसरली जाणार नाही. वृत्तानुसार, या घटनेत ज्यांचे प्राण गेले त्यांचा आम्ही आदर करतो. तसेच, ही घटना आम्ही ध्यानात ठेवतो. तसेच, इंग्लंड सरकार या घटनेचा निशेष करते, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
... आता 'ती' वेळ आली आहे
लंडनचे महापौर सादिक खान यांनी अमृतसरच्या दौऱ्यावर मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आता वेळ आली आहे की, इंग्लंड सरकारने जालियनवाला गोळीबाराबाबत माफी मागायला हवी. पाकिस्तानी वंशाचे खान भारत आणि पाकिस्तानातील तीन-तीन शहरांच्या अधिकृत दौऱ्यावर होते. या दौऱ्यांतर्गत ते अमृतसर येथेही आले होते.
सादीक खान यांनी रजिस्टरमध्ये लिहीले
जालियनवाला बाग गोळीबारात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली आर्पण करत खान यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहीले की, आता वेळ आली आहे की, इंग्लंड सरकारने 1919मध्ये झालेल्या जालियनवाला गोळीबारप्रकरणी माफी मागावी. जालियनवालाला भेट हा आपल्यासाठी एक अद्भत अनुभव होता,असेही सादीक खान यांनी म्हटले आहे.