युक्रेन - रशिया युद्धाची डेडलाईन पुतीन यांच्याकडून जाहीर, पाहा कधी संपणार?
Ukraine Russia war deadline : रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आता युद्धाची डेडलाईन जाहीर केली आहे.
मास्को : Ukraine Russia war deadline : रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आता युद्धाची डेडलाईन जाहीर केली आहे. काय आहे पुतीन यांची डेडलाईन? पुतीन यांना युद्ध कधीपर्यंत संपवायचं आहे ?
युक्रेनवर रशियाने आक्रमण करून 1 महिना पूर्ण झाला आहे. युद्ध संपणार कधी असा प्रश्न जगाला पडलाय. त्याचं उत्तर पुतीन यांनीच देऊन टाकलंय. पुतीन यांना हे युद्ध 9 मे आधी संपवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत 9 मे आधी युद्ध संपवा असे आदेशच पुतीन यांनी रशियन कमांडर्सना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
9 मे हा दिवस रशियात व्हिक्टरी डे म्हणून साजरा केला जातो. नाझी फौजांच्या माघारीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. रशियावर जर्मनीने 1941 साली युद्धबंदीचा करार मोडून हल्ला केला होता. 1945 मध्ये रशियन भूमीतून जर्मन सैन्याने माघार घेतली होती. या विजयाचा जल्लोष 9 मे या दिवशी साजरा केला जातो.
रशियानं आता कोणत्याही परिस्थितीत युद्ध संपवण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे बेचिराख केलेल्या युक्रेनला गुडघ्यावर आणण्यासाठी रशिया रासायनिक हल्लाही करू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जातेय. रशियानं या आठवड्यात दोन वेळा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली. त्यामुळे आता ठरलेल्या डेडलाईनपर्यंत युक्रेनवर विजय मिळवण्यासाठी रशिया कोणत्या थराला जाणार याचीच चिंता जगाला आहे.