Russia Ukraine संघर्ष वाढणार, Video जारी करत यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाच्या सैन्याला खुलं चॅलेंज
Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्हिडिओ शेअर करत आता रशियाला थेट आव्हान दिलंय.
कीव : रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आता रशियाला थेट आव्हान दिलंय. युक्रेनच्या राष्ट्रपती भवनातून त्यांनी शत्रू सैन्याला खुला इशारा दिला आहे. विजय मिळेपर्यंत देशासाठी लढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वतः युक्रेनच्या राष्ट्रपती भवनातून एक व्हिडिओ जारी केला आहे.
झेलेन्स्की यांचे कीवमधून आव्हान
झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याच्या अफवांनी जोर पकडला होता. आता हा व्हिडिओ जारी करून झेलेन्स्कीनेच या अफवांचे खंडन केले आहे. कीव येथील राष्ट्रपती भवनात फिरत असताना त्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ पोस्ट करत झेलेन्स्की म्हणाले की, मी राजधानी कीवमध्ये आहे आणि कोणाला घाबरत नाही. मी बंकरमध्ये लपत नाही आणि जोपर्यंत हे देशभक्तीपर युद्ध जिंकणे आवश्यक आहे तोपर्यंत कीवमध्येच राहीन. झेलेन्स्की यांनी राष्ट्रपती भवनातून आपला व्हिडिओ प्रसिद्ध करून रशिया आणि तेथील जनतेला युद्धापासून दूर जाणार नाही आणि कीवमध्येच राहण्याचा संदेश दिला आहे, हे या व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे.
रशियन सैन्याचा कीवला चारही बाजूंनी वेढा
झेलेन्स्कीचा हा व्हिडिओ अशावेळी समोर आला आहे जेव्हा रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवला चारही बाजूंनी वेढा घालत आहे. झेलेन्स्कीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मी नेहमीच म्हणत आलो की सोमवार हा खूप कठीण दिवस आहे. आपल्या देशात युद्ध सुरू आहे. त्यामुळे आमच्यासाठी आता प्रत्येक दिवस सोमवार आहे. झेलेन्स्की देखील राष्ट्रपती भवनात त्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसले.
रशियन सैन्याकडून सुमीमध्ये प्रचंड विनाश
रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आता 13 व्या दिवसात दाखल झाले आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे खूप नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक शहरे आणि निवासी क्षेत्रे उद्ध्वस्त झाली आहेत. आज मंगळवारी युक्रेनच्या सुमी शहरात रशियन सैन्याने मोठा विध्वंस केला आहे. सुमीमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दोन मुलांसह 21 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.