वॉशिंग्टन : Coronavirus कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान ठरलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विषाणूच्या संसर्गामुळे जगातील कित्येक देश आणि या देशांतील कैक नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेकांना तर, यामध्ये आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशामध्येच सध्याच्या घडीला कोरोनाचा सर्वाधिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणारा देश म्हणून अमेरिकेचं नाव पुढे येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश अतिशय मोठ्या संकटातून जात असतानाच दर दिवशी संपूर्ण जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्या अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. कधी स्वत:ची कोरोना चाचणी करणारे, तर कधी माध्यमांसमोर येऊन कोरोनाच्या परिस्थितीविषयी माहिती देणारे ट्रम्प आता असं काही भाकित करुन गेले आहेत ज्यामुळे ते पुन्हा एकदा वैश्विक स्तरावर अनेकांचं लक्ष वेधत आहेत. 


सर्वत्र कोरोऩा विषाणूवरील लसीचा शोध लावण्याचं काम अतिशय वेगानं सुरु असतानाच ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार मात्र कोणत्याही प्रकारच्या लसीशिवायच कोरोनाचा नायनाट होणार आहे. किंबहुना कोणत्याही लसीशिवायच हा व्हायरस दूर जाणार असल्याचं ते म्हणाले. 


वाचा : 'कोरोनाच्या उत्पत्तीबाबत ठोस पुरावे' अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा



नेमकं काय म्हणाले ट्रम्प? 


व्हाईट हाऊसमध्ये आपल्या पक्षातील काही मंडळींशी संवाद साधताना त्यांची हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे. 'हा (कोरोना व्हायरस) कोणत्याही लसीशिवायच दूर जाईल. असा दूर जाईल की आपण त्याला पुन्हा पाहूच शकणार नाही', असं ते म्हणाले. असे अनेक आजार आले आणि कोणत्याही लसीशिवाय नाहीसे झाले, याचा त्यांनी आपल्या वक्तव्याला आधार दिला. 


 


ट्रम्प यांच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, असं विचारण्यात आलं असता आपण डॉक्टरांचं म्हणणं ऐकतो या शब्दांत त्यांनी उत्तर दिलं. 'मी फक्त डॉक्टरांचंच ऐकतो. त्यांचं म्हणणं आहे, की असं होणार आहे. बरं याचा अर्थ असाही नाही की हे याच वर्षी होणार आहे किंवा हे विषाणू जात आहेत. पण, अखेर ते नाहीसे होतील. बरं, आता लस हाताशी असती तर सहाजिकच कोरोनावर मात करण्यासाठी याचा मोठा फायदा झाला असता', असं ते म्हणाले.