वॉशिंग्टन: अमेरिकेला hydroxychloroquine या औषधाचा पुरवठा न केल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शनिवारी फोनवरून चर्चा झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी कोरोनावरील उपचारात परिणामकारक ठरत असलेल्या hydroxychloroquine या औषधाचा अमेरिकेला पुरवठा करण्यासंदर्भात मोदींशी चर्चा केली होती. 
भारत हा जगातील प्रमुख औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामध्ये hydroxychloroquine या गोळीचाही समावेश आहे. भारताने या औषधाची निर्यात बंद केल्याने साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात या गोळीसह औषधांचा तुटवडा जाणवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती

त्यामुळे भारताने अमेरिकेन कंपन्यांकडून देण्यात आलेली hydroxychloroquine गोळ्यांची ऑर्डर पूर्ण करावी, अशी विनंती ट्रम्प यांनी मोदींकडे केली होती. मात्र, भारतातील सध्याची परिस्थिती पाहता मोदी सरकार hydroxychloroquine चा इतका मोठा साठा अमेरिकेला देण्यास राजी नाही.

त्यामुळे आता ट्रम्प यांनी भारताला थेट इशाराच दिला आहे. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो होतो.  hydroxychloroquine औषध पुरवले तर अमेरिका तुमची आभारी राहील, असे मी त्यांना सांगितले. मोदींना ते शक्य झाले नाही तरी ठीक आहे. मात्र, याला जशास तसे उत्तर नक्कीच दिले जाईल. किंबहुना ते का दिले जाऊ नये, असा धमकीवजा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका भारताची अडवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिका सध्या पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. आतापर्यंत १० हजारापेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात ४७७८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा १३६ वर पोहोचला आहे.