वॉशिंग्टन: अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे मॅटिस यांनी हे पद सोडले. ट्रम्प यांनी सीरियात आयसिसचा पराभव झाल्याचे सांगत अमेरिकन फौजा माघारी घेण्याचे संकेत दिले होते. यानंतर जेम्स मॅटिस यांनी संरक्षणमंत्रीपद सोडले. तुमच्या विचारसरणीशी अधिक जवळचा असणारा संरक्षणमंत्री असणे, हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे या पदावरून पायउतार होणे, मी उचित समजत असल्याचे मॅटिस यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहले आहे. त्यांच्या या विधानाचा रोख ट्रम्प यांच्या दिशेने होता. ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. 



दरम्यान ट्रम्प यांनी मॅटिस यांच्या विधानाविषयी ट्विटरवरून भाष्य करताना म्हटले की, जनरल जेम्स मॅटिस येत्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त होत आहेत. गेली दोन वर्षे ते माझ्यासोबत काम करत होते. त्यांच्या कार्यकाळात लष्करी साहित्याच्या खरेदीचे अनेक मोठे प्रस्ताव मार्गी लागले. आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध देशांना अमेरिकेशी जोडण्यात आणि त्यांची लष्करी जबाबदारी निभावण्यात जनरल मॅटिस यांनी मला खूप मदत केली. लवकरच नव्या संरक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा होईल. जेम्स यांच्या सेवेसाठी मी त्यांचे आभार मानतो, असे ट्रम्प यांनी सांगितले.