वॉशिंग्टन : अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम आज जगभरातल्या बाजारात बघायला मिळत आहेत. भारतीय वेळेनुसार काल रात्री डाऊजोन्स निर्देशांक 4.6 टक्के अर्थात 1600 अंकांनी कोसळून 24 हजार 345 वर बंद झाला. त्यानंतर आज सकाळी उघडलेला जपानची राजधानी टोकियोच्या शेअर बाजारातही विक्रमी पडझड झालीय. 


व्याजाच्या दरात वाढीची भीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानचा निर्देशांक निकाईसुद्धा पाच टक्क्यांनी घसरलाय. येत्या काही दिवसात व्याजाच्या दरात अतिरिक्त वाढ होण्याच्या भीतीनं अमेरिकन बाजारात विक्रीची मोठी लाट बघायला मिळाली. याशिवाय ट्रम्प प्रशासानानं अमेरिकन अर्थव्यवस्था दीर्घकालीन स्थैर्याकडे वाटचाल करत असल्याचं म्हटलंय. गेल्या आठवड्याच्या शेवटीच अमेरिकन बाजारातून पडझडीचे संकेत येऊ लागले होते.


बाजारात अस्वस्थता आहे


डोनाल्ट ट्रम्प प्रशासनानं केलेल्या कर कपातीच्या अंमलबजाणीच्या घोषणेनंतर अमेरिकन बाजार गेलं वर्षभर सातत्यानं वर जात होता. प्रत्यक्षात ही घोषणा वर्षभरानंतर सत्यात उतरताना दिसत नाहीय. त्यामुळे बाजारात अस्वस्थता आहे. 


भारतीय बाजारावर दिसणार परिणाम


त्यातच फेडरल रिझर्व्ह म्हणजेच अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेनं यंदा व्याजाच्या दरात अतिरिक्त वाढ होऊ शकते, असे संकेत जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले. त्यामुळे काल अमेरिकन बाजारात विक्रीचा सपाटा बघायला मिळतोय. अमेरिकन बाजारातल्या या पडझडीचं प्रतिबिंब आज भारतीय बाजारातही पडणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.