मासे खाणे महिलेच्या जीवावर बेतले, दुसऱ्याच दिवशी थेट रुग्णालयात, हात-पाय गमवावे लागले
Tilapia Fish US: मासे खाणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. मासा खाल्ल्यानंतर महिला थेट रुग्णालयातच पोहोचली आहे. काय घडलं नेमकं जाणून घ्या.
Tilapia Fish News: नॉनव्हेज लव्हर्ससाठी मासे हा विक पॉइंट असतो. मासेप्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार, मासे खाल्ल्याने महिलेच्या शरीरात अनेक गुंतागुंती निर्माण झाल्या. गंभीर संसर्ग झाल्याने महिलेने दोन हात व पाय गमावले आहेत. कॅलिफॉर्नियातील सॅन जोस या 40 वर्षीय लौरा बाराजस हिने तिलापिया/ तिलापी मासा अर्धवट शिजवला होता तो मासा तसाच खाल्ला होता त्यानंतरच तिच्या शरीरात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येतेय. महिलेवर वेळीच शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तिचा जीव तर वाचला मात्र तिच्यावर दोन्ही हात व पाय गमावण्याची वेळ आली आहे.
एका रिपोर्टनुसार, लौरा हिने दुषित मासा खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे. सॅन जोस येथील स्थानिक बाजारातून तिने मासे खरेदी केले होते. मासा खाल्ल्यानंतर काही दिवसांनी ती भयंकर आजारी पडली. तिने घरीच तिच्यासाठी मासे शिजवले होते. त्यानंतरच तिच्या प्रकृतीत बिघाड होत गेला. लौरा हिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, लौरा हिने जवळजवळ आपला जीव गमावला होता. तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केल्यावर ती काही काळासाठी कोमात गेली होती. तिच्या पायाची बोटे, पाय, खालचा ओठ काळे पडले होते. तिला सेप्सिस झाला होता. तिची किडनीदेखील निकामी होत होती. रुग्णालयात एक महिना उपचार घेतल्यानंतर तिचे प्राण वाचले. परंतु दुर्दैवाने तिला आता हात-पाया गमवावे लागले आहेत.
मेसिनाने दिलेल्या माहितीनुसार लौराला व्हिब्रिओ व्हल्निफिकसचा संसर्ग झाला होता. हा एक जिवाणू संसर्ग आहे. अमेरिकेत दरवर्षी अशाप्रकारच्या संसर्गाची 150-200 प्रकरणे असतात आणि संसर्ग झालेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू होतो. कधी-कधी आजारी पडल्यानंतर एक ते दोन दिवसांतच त्यांचा मृत्यू होतो. दुषित जेवण, पदार्थ, जखम, टॅटू यामुळं या जीवाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बॅक्टेरिया विशेषतः ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. मेसिना हिने त्रिणीच्या वैद्यकीय खर्चात मदत करण्यासाठी GoFundMe ची स्थापना केली आहे. आतापर्यंत 20 हजार डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.