ब्रिटनमधील दहशतवादी हल्लेखोराचं पाकिस्तान कनेक्शन उघड
पाकिस्तानशी त्याचं नाव जोडलं जात आहे.
नवी दिल्ली : शुक्रवारी ब्रिटनमधील लंडन ब्रिज येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने साऱ्या जगाला धक्का बसला. या हल्ल्यात दोन नागरिकांना मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले. बनावट विस्फोस्टकांचं जॅकेट घालणाऱ्या त्या हल्लेखोराने त्यावेळी आत्मघाती हल्ल्याची धमकीही दिली होती. ज्यानंतर पोलींसाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तो हल्लेखोर मारला गेला. लंडनमध्ये हल्ला करण्यासाठी त्याने सराव करत, या भागाची पूर्वी पाहणीही केली होती.
उस्मान खान अशी त्या हल्लेखोराची ओळख पटली असल्याची माहिती नील बसू या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानशी त्याचं नाव जोडलं जात आहे. काश्मीरवर हल्ला करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या वडिलोपार्जित भूखंडावर दहशतवादी तळ सुरु करण्याचा त्याचा मानस होता, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलं आहे. २०१२मध्ये त्याला याच दहशतवादी कारवायांच्या आधारे कारावासाची शुक्षाही झाली होती. ज्यानंतर २०१८ला त्याच्या हालचालींवर आणि कृतींवर लक्ष ठेवलं जाणार असल्याचं सांगत त्याची सुटका करण्यात आली.
कोणतंही कारण न देता त्याने UKमधील शालेय शिक्षण सोडलं. ज्यानंतर तो पाकिस्तानमध्ये आईसोबत राहू लागला. त्यावेळी त्याची आई आजारी असल्याचं सागंण्यात येतं. ब्रिटनमध्ये परतल्यानंतर त्याने इस्लाम धर्म आणि कट्टरतावादाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार दहशतवादी कारवायांना दुजोरा देण्याच्या विचारात असणाऱ्या गटांमध्ये तो वयाने सर्वात लहान होता. दरम्यान, त्या वेळी या संघटनेकडून आखण्यात आलेल्या कटांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या माध्यमातून तेथे येणाऱ्यांना शस्त्र चालवण्याचं शिक्षण देत २६/११ प्रमाणे एखादा हल्ला अमेरिकेच्या संसदेवर करण्याताही कट आखण्यात आला होता.
२०१२ मध्ये दहशतवादी कारवायांमधील सहभाग पाहता, दहशतवाद पसरवणं, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, चुकीच्या कारवायांमध्ये मदत करणं असे आरोप त्याच्यावर लावण्यात आले होते. ब्रिटनमध्येही सक्रिय असणाऱ्या अल- कायदा या दहशतवादी संघटनेशी मिळतेदुळते विचार असण्याच्या आणि आयएसआयएसशी संपर्कात असण्याचा संशयही त्याच्यावर आहे.