Joe Biden Falls: अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष (US President) जो बायडन (Joe Biden) हे जाहीर कार्यक्रमामध्ये स्टेजवर अडखळून पडले. गुरुवारी कोलेरॅडो येथे अमेरिकी एअरफोर्स अकादमीच्या पदवीदान (US Air Force Academy Graduation Ceremony) समारंभ पार पडला. याच कार्यक्रमामध्ये बायडन मंचावर चालताना पडले. राष्ट्राध्यक्ष पडल्याचं पाहिल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना उठून उभं राहण्यास मदत केली. सुदैवाने यामध्ये बायडन जखमी झाले नाहीत. व्हाइट हाऊसने यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे. बायडन यांची प्रकृती ठीक आहे असं सांगितलं. 


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

80 वर्षीय बायडन यांनी कोलेरॅडोमधील या कार्यक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबोधित केलं. भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी बायडन स्टेजच्या दुसऱ्या बाजूला जात असताना पोडियमजवळ पडले. बायडन यांना लगेच सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांनी हात दिला. त्यांना उभं राहण्यासाठी या अधिकाऱ्यांनीच मदत केली. मात्र हा किरकोळ अपघात होता. बायडन हे नंतर कोणाचाही आधार न घेता पुढे चालत गेले. पुढील संपूर्ण कार्यक्रमात ते सामान्यपणेच वावरत होते. 


कशामुळे पडले बायडन?


आपलं भाषण संपल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी निघाले त्यावेळी मंचावर असलेल्या सॅण्डबॅगजवळ (रेतीचं छोटंसं पोतं) ते अडखळले. टेलीप्रॉम्टरला आधार म्हणून ही सॅण्डबॅग मंचावर ठेवण्यात आली होती. बायडन यांनी उभं राहिल्यानंतर आधी या छोट्या पोत्याकडे बोट दाखवल्याने ते यालाच अडखळून पडल्याचं सांगितलं जात आहे. व्हाइट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनीच हा व्हिडीओ ट्वीट करताना राष्ट्राध्यक्ष सॅण्डबॅगमुळे अडखळून पडल्याचं म्हटलं आहे.


व्हाइट हाऊसमध्ये गेल्यानंतर..


व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जीन पियरे यांनी बायडन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं म्हटलं आहे. बायडन या कार्यक्रमानंतर व्हाइट हाऊसमध्ये परतले तेव्हा त्यांच्या वैदयकीय टीमचे त्यांची चौकशी केली. त्यावेळेस बायडन यांनी आपण ठीक असल्याचं सांगितलं. तसेच आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचंही ते म्हणाले. हा अपघात कसा काय झाला यासंदर्भात विचारलं असता सॅण्डबॅगमुळे मी अडखून पडल्याचं सांगितलं असंही बायडन यांनी सांगितल्याचं व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.



यापूर्वीही अनेकदा पडलेत बायडन


यापूर्वीही बायडन अशाप्रकारे अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान पडले आहेत. एकदा विमानामध्ये चढताना बायडेन पायऱ्यांवर अडखळून पडले होते. पुन्हा त्यांच्याबरोबर असाच प्रकार झाल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली जात आहे. बायडन हे निवडून आले तेव्हा अमेरिकेचे सर्वाधिक वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष ठरले होते.