Golden Egg In Sea Video: अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या एका गटाला पॅसिफिक महासागरामधील एका शोध मोहिमेदरम्यान अनोखी गोष्ट हाती लागली आहे. समुद्रामधील ज्वालामुखींचा अभ्यास करणाऱ्या या संशोधकांना एका अर्थाने मोठी लॉटरीच लागल्याचं म्हटलं जात आहे. पाण्यातील ज्वालामुखीजवळ या संशोधकांना एक खास गोष्ट सापडली आहे. या अनोख्या गोष्टीचा शोध घेतल्यानंतर संशोधकांनी त्याला 'भितीदायक सुवर्ण अंड' असं नाव दिलं आहे. मियामी हेराल्ड या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी संशोधकांच्या एका टीमला दक्षिण अलास्काच्या किनाऱ्यापासून आत खोल समुद्रामध्ये गोल्डन एग म्हणजेच सोन्याचं अंड सापडलं आहे.


यात काहीतरी विचित्र असेल असं वाटलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सीस्कोप अलास्का-5' या मोहिमेमध्ये एका गुप्त ज्वालामुखीचा शोध घेताना संशोधकांच्या टीमला जवळजवळ 2 मैल (3.21 किलोमीटर) खोल समुद्रामध्ये एक रहस्यमय भेग असलेला आणि चमकणारा धातूसारखा गोळा दिसून आला. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जाणाऱ्या एका यंत्राच्या माध्यमातून या अंड्याला समुद्र संशोधकांच्या एका टीमने बाहेर काढलं. सुरुवातीला या अंड्यामध्ये काहीतरी भयानक आणि फारच विचित्र गोष्ट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 


यात नेमकं काय सापडलं?


मात्र यामधून जी गोष्ट समोर आली ती सुद्धा आश्चर्यचकित करणारी होती. या गोल्डन एगमध्ये जिलेटिनसारख्या पदार्थाऐवजी रेश्मासारखी रचना असल्याचं दिसून आलं. या पदार्थांना पुढील अभ्यासाठी काळजीपूर्वकपणे टेस्ट ट्युब्समध्ये जमा करण्यात आलं आहे. आता प्रयोगशाळेत या पदार्थांवर सविस्तरपणे अभ्यास आणि संशोधन केलं जाणार आहे. 



वेगवेगळ्या शक्यता


वैज्ञानिकांना सापडलेल्या या चमकणाऱ्या गोष्टीवर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. काहींनी चमकणारी ही अंड्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या प्राचीन काळातील प्राण्याच्या अंड्याचं साल असू शकत अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसेच काहींनी समुद्राच्या तळाशी असलेल्या मृत स्पंजचा हा भाग असावा असंही म्हटलं आहे. मात्र वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी ही वस्तू नेमकी कशी तयार झाली, ती तिथं कुठून आली यासंदर्भातील माहिती सविस्तर अभ्यास केल्यानंतरच समोर येईल असं सांगण्यात आलं आहे.