काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यामुळे अफगाण नागरिकांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे सर्वात जास्त धोका महिलांच्या जीवाला आहे. तालिबान काबूलमध्ये येताच महिला आपले प्राण मुठीत घेवून पळत आहेत. अशात अफगाणिस्तानच्या एका फिल्ममेकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अफगाणिस्तानमधील या फिल्मनेकरचं नाव सहारा करीमी (Sahrra Karimi) असं आहे. हा व्हिडिओ खुद्द सहारा करीमी यांनी तयार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये सहारा करीमी रस्त्यावर पळताना दिसत आहेत. सहाराने व्हिडिओ शूट करत तेथील परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. फिल्ममेकरने सांगितलं की, '15 ऑगस्ट रोजी पैसे काढण्यासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. पण प्रतीक्षा केल्यानंतर देखील पैसे मिळाले नाही. तेव्हा अचानक बाहेरून गोळ्यांचा आवाज आला.' 


गोळ्यांचा आवाज आल्यामुळे बँकेच्या मॅनेजरने त्यांना जाण्यास सांगितलं. तालिबानी अत्यंत जवळ पोहोचल्यामुळे मॅनेजरने फिल्ममेकरला मागच्या दरवाजाने जाण्यास सांगितले. करीमी त्या लोकांपैकी एक आहेत जे अफगाणिस्तान सोडून जाण्यास यशस्वी झाले आहे. त्या सध्या यूक्रेनची राजधानी कीवमध्ये आहेत. सध्या करीमी यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 


व्हिडिओमध्ये दिसत आहे की, करीमी स्वतःचा जीव मुठीत घेवून पळत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ अत्यंत भयावह आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंदाज लावू शकतो की अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.