इस्लामाबाद: पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याचा प्रकार समोर आला आहे. इस्लामाबादमध्ये भाषण करताना ही घटना घडली. विजेचा धक्का लागण्याआधी अनुच्छेद ३७० वरून रशीद पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी रशीद यांनी ध्वनीक्षेपक (माईक) हातात पकडला होता. या माईकभोवती त्यांनी कापडही गुंडाळले होते. भाषण सुरु असताना अचानक या माईकमध्ये वीजप्रवाह उतरला आणि रशीद यांना शॉक लागला.


यानंतर त्यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले. त्यानंतरही रशीद यांचा मोदीद्वेष कमी झाला नाही. काहीही झालं तरी मोदी रोखू शकणार नाहीत, अशा वल्गना रशीद यांनी केल्या. 


काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल तणाव प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर काही पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्याने भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. यामध्ये शेख रशीद आघाडीवर असतात. 



काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाकिस्तानवर हल्ला झाल्यास भारतीय उपखंडाचे चित्र बदलून जाईल, अशी दर्पोक्ती केली होती. 


भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला तर युद्धाला तोंड फुटेल. यानंतर पाकिस्तान युद्धात उतरला तर संपूर्ण भारतीय उपखंडाचा नकाशा बदलून जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, काश्मीरमध्ये आल्यानंतर भारताचा अजेंडा पूर्ण होईल, या भ्रमात राहू नकात. भारत आता पाकव्याप्त काश्मीरवर चढाई करण्याचा विचार करत असेल. 


मात्र, पाकव्याप्त काश्मीरवरील हल्ला हा संपूर्ण देशावरील हल्ला समजला जाईल. पाकिस्तान मोठा देश आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास संपूर्ण भारतीय उपखंडाचे चित्र बदलून जाईल, असे शेख रशीद यांनी म्हटले होते.