Video Rips Open Road Flip Cars: दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरामध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे. या शहरामध्ये भूमिगत गॅस पाइपलाइनचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी सायंकाळी हा अपघात घडल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. मोठा आवाज होऊन स्फोट झाला तेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अनेक गाड्या जागेवर काही फुटांपर्यंत हवेत उडाल्याची दृष्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाली आहेत. 


एका व्यक्तीचा मृतदेह सापडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोहान्सबर्गच्या सार्वजनिक सुरक्षेसंदर्भात महापौरांच्या समितीमधील एका सदस्याने ट्वीटरवरुन, "सार्वजनिक सुरक्षेसाठी एमएमसी डॉ. मॅगजीसिनी तश्वाकु यांनी घटनास्थळांची पहाणी केली आहे. आपत्कालीन सेवांच्या माध्यमातून तातडीने मदत पोहचवण्यात आली आहे. तसेच या स्फोटामुळे नेमकं किती नुकसान झालं आहे यासंदर्भातील माहिती गोळा केली जात आहे," असं सांगितलं. शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख रॉबर्ट मुलौदजी यांनी या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "जॉबर्ग सीबीडीजवळ (केंद्रीय व्यापारी जिल्हा) झालेल्या अपघातामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह अग्नीशामन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतला आहे. या दुर्घटनेमधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपाचारांनंतर मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे," असंही रॉबर्ट यांनी सांगितलं.


लोक सैरावैरा पळू लागले


भूमीगत गॅस पाईपलाइनच्या स्फोटानंतर स्थानिकांमध्ये एकच दहशत पसरली. या स्फोटामुळे ही पाईपलाइन ज्या रस्त्याच्या खालून गेली आहे तो रस्ता पूर्णपणे उध्वस्त झाला. अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक वाहने रस्त्याच्याकडेला असलेल्या इमारतींना धडकली. दुसरा स्फोट होण्याच्या भीतीने लोकांनी रस्त्यावर आजाबूजूच्या इमारतींमध्ये पळ काढला.



अनेक रस्ते बंद


जॉबर्ग मेट्रो पोलीस विभागाने स्फोटानंतर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं सांगितलं आहे. हा स्फोट झाला त्या ठिकाणापासून काही अंतरावरील परिसरामध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आळी आहे. लिलियन न्गोई (ब्री) स्ट्रीट, वॉन वेइली स्ट्रीट, रहीमा मूसा स्ट्रीट, प्लिन स्ट्रीट, सायमन्ड स्ट्रीट, हॅरिसन स्ट्रीट, रिसिक स्ट्रीट, जॅबर्ट स्ट्रीट, एलॉफ स्ट्रीट, वॉन ब्रॅण्डिस स्ट्रीट हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 


यापूर्वीही झाली होती गॅसगळती


शहराचे प्रवक्ते जोलानी फिहला यांनी, "लोकांच्या सुरक्षेसाठी अन्य मार्गांवरुन वाहतुक वळवण्यात आली आहे. या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस कर्मचाऱ्यांनाही तैनात करण्यात आलं आहे. सर्वसामान्यांना या ठिकाणी सध्या प्रवेश दिला जात नाही," अशी माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेमध्ये यापूर्वीही 6 जुलै रोजी जोहान्सबर्गमध्ये विषारी गॅसगळती झाल्याने एकूण 16 जणांचा मृत्यू झाला होता.