World Busiest Pedestrian Crossing: वर्दळीच्या ठिकाणी रस्ता ओलांडणे हे फार मोठं दिव्य असतं. अनेकदा सज्ञान व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना गोंधळून जायला होतं. मात्र काही ठिकाणी हे अगदी सवयीचं झाल्याप्रमाणे लोक सहज रस्ता ओलांडताना दिसतात. जपानची राजधानी असलेल्या टोक्योमध्ये एक जगप्रसिद्ध चौक आहे. या चौकाचं नाव 'शिबुया क्रॉसिंग' असं आहे. या चौकाला 'शिबुया स्कॅम्बल क्रॉसिंग' असंही म्हणतात. हा चौकाचं वैशिष्ट्य म्हणजे रस्ता ओलांडणाऱ्यांच्या संख्येचा विचार केला तर हा जगातील सर्वाधिक गजबजलेला चौक आहे. एकदा सिग्नल लागल्यावर सर्व बाजूचे लोक हा रस्ता ओलांडतात. हा रस्ता ओलांडताना एकाच वेळेस 3 हजार लोक रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातात. आता चालणाऱ्यांची संख्या वाचून तुम्हाला या बाता वाटत असतील तर या दाव्याला समर्थन करणारा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला हा रस्ता किती गजबजलेला आहे याचा अंदाज बांधता येईल.


जगातील सर्वात गजबजलेला चौक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सीएन ट्रॅव्हल'ने दिलेल्या माहितीनुसार, हा चौक शिबुया स्थानकासमोर आहे त्यावरुन त्याला 'शिबुया क्रॉसिंग' असं नाव पडलं आहे. 'शिबुया स्क्रॅम्बल' असं टोपणनाव या चौकाला देण्यात आलं आहे. या चौकामध्ये दर 80 सेकंदांनंतर वाहने सिग्नलमुळे थांबतात. सिग्नल लागल्यानंतर अगदी कमी गर्दीच्या वेळेही किमान 1 हजार तर गर्दीच्या वेळेस 3 हजार लोक रस्ता ओलांडतात. त्यामुळेच या चौकाला जगातील सर्वात गजबजलेला चौक म्हणून ओळखलं जातं. या चौकामध्ये कायमच लोकांची गर्दी असते असं अनेकजण सांगतात.


व्हिडीओ पाहून व्हाल थक्क


एक्सवरील (आधीचं ट्वीटर) हाऊ थिंग्स वर्क नावाच्या हॅण्डवरुन याच चौकाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 8 सेकंदाच्या या व्हिडीओला कॅप्शन देताना, "टोक्योमधील शबुया क्रॉसिंग जगात एकाच वेळेस सर्वाधिक लोक पायी चालत रस्ता ओलांडतात असा चौक आहे. एका वेळेस या ठिकाणी 3000 लोक रस्ता क्रॉस करतात," असं म्हटलं आहे. या व्हिडीओला मागील काही दिवसांमध्ये 1.8 मिलियन व्ह्यूज आहेत. 2 हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ रिशेअर करण्यात आला आहे. तर 9 हजारांच्या आसपास लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओवर 188 जणांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.



10 रस्ते एकत्र येतात...


'सालसा वर्ल्ड ट्रॅव्हलर'च्या अहवालानुसार, 'शिबुया क्रॉसिंग'वर 10 रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी असते. वेगवेगळ्या रस्त्यांवरुन येणारे लोक सिग्नलची वाट पाहत उभे असतात. मग सिग्नल लागल्यावर एकाच वेळी रस्ता ओलांडतात. शिबुया क्रॉसिंग परिसरामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी वर्दळ अधिक असते.