नवी दिल्ली : भारतीय बँकांना ९००० कोटींचा गंडा घालून इंग्लंडमध्ये पळून गेलेला विजय मल्ल्या आता गुडघ्यावर आलाय. भारतीय बँकांकडून घेतलेले कर्ज १०० टक्के परत करण्याचा प्रस्ताव मल्ल्याने ठेवलाय. मल्ल्याने भारतात प्रत्यार्पण केलं जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका ब्रिटीश कोर्टापुढे केलीय. त्यावर उद्या निकाल अपेक्षित आहे. त्याआधी घाबरलेल्या मल्ल्याने भारतीय बँकांना १०० टक्के कर्जफेडीचा प्रस्ताव ठेवलाय. विविध बँकांकडून घेतलेलं कर्ज विमानाच्या महागडं इंधन घेण्यात खर्च झाल्याचा दावा मल्ल्याने ट्वीटमधून केलाय. बँकांना आपण १०० टक्के कर्जफेडीचा प्रस्ताव पाठवलाय तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती मल्ल्याने केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकांकडून घेतलेलं संपूर्ण कर्ज (प्रिन्सिपल अमाऊंट) परत करण्यासाठी तयार असून भारतीय बँकांनी आणि सरकारनं हे घ्यावं, असं म्हणत माल्ल्यानं अक्षरश: लोटांगणच घातलंय. 



'राजकीय नेते आणि मीडिया मोठ्या आवाजात मी सार्वजनिक बँकांचा पैसा घेऊन फरार झालेला डिफॉल्टर असल्याचं सांगत आहेत. पण हे चुकीचं आहे. मला योग्य संधी दिली जात नाही... आणि याच मोठ्या आवाजात कर्नाटक हायकोर्टात माझ्यासमोर केलेली सेटलमेंटची गोष्ट का बोलली जात नाही... हे दु:खद आहे' असं ट्विट माल्यानं केलंय. 



'किंगफिशर एअरलाईन्स एटीएफच्या किंमती वाढल्यानं आर्थिक संकटाचा सामना करत होती. तेलाच्या सर्वाधिक क्रूड किंमत १४ डॉलर प्रती बॅरलचा सामना किंगफिशरला करावा लागला. यामुळे तोटा वाढत गेला आणि बँकांचं कर्ज यात खर्च झालं. मी बँकांकडून घेतलेलं मूळ कर्ज १०० टक्के परत करायला तयार आहे. कृपया ते स्वीकारा' असं म्हणत माल्या गुडघ्यावर आलाय.



'मी विनम्रतापूर्वक बँकांना आणि सरकारला हे कर्ज परत घेण्याची विनंती करतोय. पण हे अस्वीकार केलं जात असेल तर सांगा ते का केलं जातंय?' असाही प्रश्न माल्यानं विचारलाय.



माल्यावर ईडीनं ९००० करोड रुपयांचं कर्ज न फेडण्याचा आरोप केलाय. याशिवाय त्याच्यावर काही कर्जाच्या रक्कमेची अफरातफर करण्याचाही आरोप आहे. विजय माल्यानं २ मार्च २०१६ रोजी जर्मनीहून लंडनला पलायन केलं होतं. चौकशी समितीनं माल्या संदिग्ध परिस्थितीत देश सोडून गेल्याचा दावा केला होता.