Viral Video : एका भीषण हेलिकॉप्टर अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची हादरवणारी बातमी नुकतीच समोर आली. मलेशियामध्ये हा अपघात झाला असून, तिथं नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाल्यामुळं एक भयंकर अपघात झाला आणि एकच हाहाकार माजला. सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. रॉयल मलेशियन नेव्ही/ नौदलाच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. जिथं, सरावादरम्यान लष्कराचे दोन हेलिकॉप्टर उड्डाणानंतर हवेतच एकमेकांवर धडकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार काही हेलिकॉप्टरचं उड्डाण झालं आणि सर्वच एका दिशेनं पुढे जाताना दिसली. तितक्यातच मागून येणाऱ्या एका हेलिकॉप्टरनं दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडक दिली आणि पाहता पाहता ते दोन्ही हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळून त्यांचा चक्काचूर झाला. 


हेसुद्धा वाचा : अमिताभही झाले अलिबागकर! विस्तीर्ण भूखंडाच्या खरेदीसाठी मोजली 'इतकी' किंमत


मंगळवारी लुमुट येथील रॉयल मलेशियन नेवी स्टेडियममध्ये हा सराव सुरु असल्याची माहिती समोर आली. जिथं फेनेक एम502-6  आणि एचओएम एम503-3 या दोन हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची बाब समोर आली. यापैकी एक हेलिकॉप्टर स्टेडियमच्या पायऱ्यांपाशी तर, दुसरं तिथं असणाऱ्या एका स्विमिंग पूलमध्ये कोसळलं. नौदलाच्या वतीनं या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा देत या अपघातानं 10 जणांचा बळी घेतल्याचं स्पष्ट केलं. मृतांमध्ये हेलिकॉप्टरमधील क्रू मेंबरचा समावेश असून, शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह तातडीनं लुमुट एयरबेस हॉस्पिटल येथे नेण्यात आले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 



हेलिकॉप्टर क्रॅश होण्याच्या या घटनांचा वाढता आकडा पाहता मलेशियातील प्रशासनानं यासाठी उच्चस्तरीय आयोगाची स्थापना करण्याचे संकेत दिले असून, आता त्यासाठी चौकशीही सुरु होणार असल्याचं सांगितलं.