VIDEO: पर्यटकांसमोर 15 फूट मगरीशी खेळत असतानाच तिने जबड्यात पकडलं, नंतर पुढे काय झालं पाहा
Viral Video: प्राणीसंग्रहालयात एका मगरीने तेथील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही नाईल मगर होती. आपल्या प्रजातीमधील ही सर्वात ताकदवान आणि मोठी आहे.
Viral Video: प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा प्राण्यांच्या करामती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा प्रयत्न अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असते. प्राण्यांनी त्यांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. दरम्यान असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. 15 फुटांच्या मगरीने कर्मचाऱ्याला थेट आपल्या जबड्यात पकडलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेत हा प्रकार धडला आहे. प्राणीसंग्रहालयात एका 15 फुटांच्या मगरीने थेट कर्मचाऱ्यावर हल्ला केला. क्वा-झुलु नतालमधील बॅलिटो येथील क्रोकोडाइल क्रीक थीम पार्कमध्ये जमलेल्या पर्यटकांच्या गर्दीला कर्मचारी मगरीसह धाडसी कृत्य करुन दाखवत होता.
कर्मचारी हातात काठी घेऊन मगरीच्या तोंडाला लावत होता. यानंतर त्याने ती काठी तिच्या पाठीवर नेली होती. मगरीने काही वेळाने आपला जबडा उघडला. पण थोड्याच वेळात तिने कर्मचाऱ्यावर हल्ला केला. गर्दीमधील एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
मगरीने आपल्या भल्या मोठ्या जबड्यात पकडल्यानंतर लोकांचा आरडाओरडा सुरु झाला होता. मगर आता त्याला आपला भक्ष्य करणार असं दिसत होतं. यादरम्यान तिथे आणखी एक मगर होती. ही मगरदेखील कर्मचाऱ्यावर तुटून पडण्याच्या प्रयत्नात होती. पण सुदैवाने काही वेळाने मगरीने आपली पकड सैल केली आणि कर्मचाऱ्याची सुटका झाली आणि त्याने तिथून पळ काढला.
ही नाईल मगर होती. आपल्या प्रजातीमधील ही सर्वात ताकदवान आणि मोठी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राणीसंग्रहायलयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्याच्या पायाला जखम झाली आहे.
प्राणीसंग्रहालयाने फेसबुकवर पोस्ट करत दिलेल्या माहितीनुसार, उद्यानातील एका पर्यटकाकडून मदतीसाठी फोन आला होता. "मदत कर्मचाऱ्यांना ताबडतोब पाठवण्यात आलं आणि पोहोचल्यावर सूचित करण्यात आलं की जखमी व्यक्तीला आधीच वैद्यकीय सुविधेत नेण्यात आलं आहे".