लिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्...
एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा...
सोशल मीडियावर सध्या चीनमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक वयस्कर महिला लिफ्टमध्ये अडकलेली दिसत आहे. विशेष म्हणजे ही महिला मुकी असून, तिला ऐकूही येत नाही. अशा स्थितीत तिला मदतीसाठी आरडाओरड करणं किंवा कोणी मदतीसाठी आवाज दिला तर तो ऐकणं शक्य नव्हतं. अशा स्थितीत महिला मोठ्या धर्मसंकटात सापडली होती. या महिलेची काय स्थिती झाली असेल याचा आपण विचारही करु शकत नाही.
या महिलेचं वय 60 वर्षं आहे. त्यावरुनही तुम्ही महिला किती हतबल झाली असेल याचा अंदाज लावू शकता. चीनच्या चांगदे येथील ही घटना आहे. घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे व्हिडीओत महिला आपल्या कुटुंबासह पाण्याच्या बाटल्या लिफ्टमध्ये ठेवताना दिसत आहे. लिफ्ट बंद होऊ नये यासाठी पाण्याच्या बाटल्या दरवाजा अडवण्यासाठी ठेवलेल्या असतात. पण वृद्ध महिला त्या बाटल्या उचलते आणि लिफ्टचा दरवाजा बंद होतो. लिफ्ट बंद झाल्याने महिला आत अडकते.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, महिला पहिल्यांदाच लिफ्टचा वापर करत असते. लिफ्ट बंद झाल्याने महिला घाबरते. यानंतर ती हाताने दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करु लागते. काही वेळाने तिला दरवाजा उघडण्यात यश येतं. पण समोर भिंत असते. यानंतर महिला भिंत आणि दरवाजाच्या फटीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करु लागते. तिथे फारशी जागा नसतानाही महिला जीव धोक्यात घालून खाली उतरताना दिसत आहे.
अखेर 40 मिनिटांनी महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली. 14 कर्मचाऱ्यांनी महिलेला सुरक्षित बाहेर काढलं. महिलेची सुटका करण्यात आल्यानंतर तिला रुग्णालात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिला पूर्णपणे व्यवस्थित असल्याची माहिती दिली आहे.
हा व्हिडीओ तसा 2022 चा आहे. पण तो पुन्हा नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.