Pregnant Waitress Viral Video : वृतपत्र, टिव्ही किंवा सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपण नेहमीच अन्याय, अत्याचार किंवा युद्धाच्या बातम्या वाचत असतो, ऐकत असतो. अशा बातम्या वाचून आपल्याला राग अनावर होतो. पण काही घटना अशाही असतात ज्या आपल्या मनाला हळवा स्पर्श करुन जातात. अशाच घटनेचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून जगभरातून या व्हिडिओचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना अमेरिकेतली (America) असून काही मित्र एका हॉटेलमध्ये ख्रिसमस पार्टी (Christmas Party) करण्यासाठी आले होते. पार्टी केल्यानंतर या मित्रांनी एक असं काम केलं ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. अमेरिकेतल्या पेंसिलवेनिया इथल्या एका हॉटेलमध्ये जेमी मायकल नावाचा एक व्यक्ती आपल्या मित्रांसोबत ख्रिसमसनिमित्ताने पार्टी करण्यासाठी आला होता. या हॉटेलमध्ये महिला वेटर्स काम करतात. यातलीच एक महिला वेटर मायकल आणि त्याच्या मित्रांना सर्व्हिस देत होती.


पण पार्टीदरम्यान मायकल आणि त्याच्या मित्रांना ती महिला वेटर गरोदर असल्याचं कळलं. यानंतर या सर्व मित्रांनी जे केलं ते खरंच कौतुकास्पद होतं. मायकल आणि त्याच्या मित्राने आपापसात काही पैसे गोळा केले. अॅश्ले बॅरेट या गरोदर महिला वेटरला या मित्रांनी तब्बल 1300 डॉलर्स म्हणजे जवळवास 1 लाख 10 रुपये टीप दिली. अॅश्ले बिल देण्यासाठी आली तेव्हा मायकल आणि त्याच्या मित्रांनी तिला 1300 डॉलर्सची टीप तिच्या हातात ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



मायकलने इतक्या रकमेची टीप देताच सुरुवातीला अॅश्लेने नकार दिला. पण मायकलने तिला टीप घेण्याची विनंती केली. यानंतर अॅश्ले भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने भावून होत मायकलला मिठी मारली. याआधी सर्वाधिक टीप किती मिळाली होती, असा प्रश्न मायकलने अॅश्लेला विचारला. यावर तिने 100 डॉलर्सची टीप मिळाल्याचं सांगितलं. 


पार्टिसाठी आलेल्या मायकल आणि त्याच्या मित्रांनी अॅश्लेसाठी पैसे गोळा केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अॅश्लेला आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अनेक जणं तिला प्रत्यक्ष भेटून तिची मदत करत आहेत. शिवाय मायकल आणि त्याच्या मित्रांचंही लोकं कौतुक करत आहे. अशाच चांगल्या लोकांमुळे जगात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याच्या प्रतिक्रिया काही जणं व्यक्त करत आहेत.