माझी होशील का? `खास` प्रियकराचं प्रपोजल पाहून प्रेयसी म्हणाली....
`विल यू बी माय सनशाईन टू होमकमिंग?`
मुंबई : अमुक एक फोटो व्हायरल झाला किंवा अमुक एक व्हिडिओ व्हायरल झाला ही अशी वाक्य दररोज आपल्या कानांवर प़डत असतात. मुळात व्हायरल होण्याचं हे प्रकरण असं आहे ज्यात कोण, कधी, कुठे आणि कसं प्रसिद्धीझोतात येईल याचा काही नेम नाही. असं म्हणण्याचं कारण की, सध्या एक प्रियकर त्याच्या प्रेम व्यक्त करण्याच्या खास अंदाजासाठी सर्वाच्याच मनात घर करत आहे.
आपल्या प्रेयसीपुढे जाऊन 'विल यू बी माय सनशाईन टू होमकमिंग?' थोडक्यात, माझी होशिल का? असाच प्रश्न त्याने तिच्यापुढे उपस्थित केला. हातात पुष्पगुच्छ घेऊन त्याचा हा प्रेम व्यक्त करण्याचा अंदाज तिला भलताच भावला.
सोशल मीडियावर या खास प्रियकराचा अंदाज पाहून सर्वांनाच एका सुरेख नात्याची झलक पाहायला मिळाली. डेव्हिड कोवान असं त्याचं नाव असून, तो सर्वसामान्यांप्रमाणे नसून Down syndromeचा सामना करत आहे. पण, त्याच्या चेहऱ्यावरील आनंदात कुठेच याचा लवलेश नाही.
खुद्द डेव्हि़च्या प्रेयसीने म्हणजेच सॅरिस मॅरी गार्सिया हिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. डेव्हिड आणि त्याची प्रेयसी या दोघांनाही Down syndrome आहे. पण, त्यांच्या नात्याच्या आड या गोष्टी कधीच आल्या नाहीत. अवघे तीन वर्षांचे असल्यापासून ते दोघंही एकमेकांना ओळखत असल्याचं 'फॉक्स १३'ने प्रसिद्ध केलं आहे. ओरलँडो येथे 'स्पीच थेरेपी' सुरु असताना त्यांची ओळख झाली होती.
मुख्य म्हणजे डेव्हिड आणि त्याच्य़ा प्रेयसीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यांच्या या प्रेमाविषयी सुरेख प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. कोणी, डेव्हिडची प्रशंसा केली तर कोणी या दोघांची जोडी कायम अशीच आनंदात राहावी अशा शुभेच्छा दिल्या.