मुंबई: गाणं... कोणासाठी ते तणाव दूर करण्याचं साधन असतं, तर कोणासाठी ते एखाद्या स्मृतीत रममाण होण्याचं साधन ठरतं. भावना व्यक्त करण्यासाठी गाण्याला अनेकांचीच पसंती मिळते. याच आवडीमुळे  मग सुरुवात होते ती प्लेलिस्टमध्ये सुरेख अशा गाण्यांचा समावेश करण्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेलिस्ट म्हणजे एखादी मौल्यवान गोष्ट असंही समजणारे काही कमी नाहीत. अशाच बहुसंख्य मंडळींच्या प्लेलिस्टमध्ये असणारं एक गाणं म्हणजे 'आज जाने की जिद ना करो'. 


एखाद्या प्रिय व्यक्तीला अतिशय विनवणी करत थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी केलेली सुरांची ही गुंफण म्हणजे क्या बात. 


फैय्याज हाश्मी यांची कलम आणि फरीदा खानूम यांच्या आवाजाने सजलेल्या या गाण्याने, खरंतर गझलने जगाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. 


सोशल मीडियावर सध्या या गाण्याचं एव वेगळंच व्हर्जन व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे तान्या वेल्स या ब्रिटीश गायिकेने ते गायल्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


लाहोर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात २०१७ मध्ये तान्याने ही सुरेख गझल सादर केली होती. तिची कला या व्हिडिओच्या माध्यमातून कैद करण्यात आली असून अनेकांपर्यंत पोहोचत आहे. 



नुसतीच पोहोचत नसून सर्वांची दादही मिळवत आहे.  


'आज जाने की जिद ना करो', असं म्हणताना तान्याच्या चेहऱ्यावर असणारे भाव आणि प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारी ही गायिका खऱ्या अर्थाने डोळ्यांचं पारणं फेडत आहे असंच म्हणावं लागेल. 


वाद्यवृंदाचीही तिला साथ मिळाल्यामुळे या गझलच्या सादरीकरणाला खऱ्या अर्थाने 'चार चाँद' लाभले आहेत.