`जैश` वर काय कारवाई केली ? अमेरिकेचा पाकिस्तानला प्रश्न
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला आहे. भारतातून जैशचा नायनाट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी संघटनांना पाठिशी घालणाऱ्या पाकिस्तानवही आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी असे परराष्ट्र सचिव वीके गोखले यांनी अमेरिका दौऱ्यात बीच जॉन बोल्टन यांना सांगितले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी देखील अमेरिकेच्या एनएसए जॉन बोल्टन यांना दहशतवाद्यांवर कारवाई करणार असल्याचा विश्वास दिला.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांविरूद्ध ठोस कारवाई करणार असल्याची चर्चा केल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले. पाकिस्तान सर्व दहशतवादी संघटनांशी दृढतेने लढेल आणि भारतासोबत तणाव परिस्थिती कमी करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू ठेवेलं असे आश्वासन पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले. जॉन बोल्टन यांनी यासंदर्भातील ट्विट केले आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. गोखले यांनी आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच अमेरिकन विदेश मंत्री माइक पोंपियो यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अमेरिका परराष्ट्र मंत्रालयातून एक निवेदन जारी करण्यात आले. अमेरिका पाकिस्तानवर दबाव बनवणे सुरूच ठेवेल असे यात म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना देत असलेले प्रोत्साहन याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. दहशतवादाविरूद्ध ठोस पाऊले उचलण्यावरही यामध्ये चर्चा झाली. दहशतवादाविरूद्ध लढताना आपण भारत सरकार सोबत असल्याचे आश्वासन पोंपियो यांनी केले.