रशियाचे लूना-25 चंद्रावर कुठे कोसळलं, तिथे नेमकं काय घडलं? नासाने फोटोसहित सादर केले पुरावे
Luna 25 Crash Site: रशियाचे लूना 25 चंद्रावर कुठे कोसळले व तिथे नेमके काय घडले हे नासाने शोधून काढले आहे. तसे फोटोही नासाकडून शेअर करण्यात आले आहेत.
Luna 25 Crash Site: भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर असताच नासानेही एक फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो आपल्या चांद्रयानाचा नसून रशियाच्या लूना 25 चा आहे. रशियाचे लूना 25 ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले त्या भागाचा फोटो नासाकडून ट्विट करण्यात आला आहे.
भारताचे चांद्रयान-3 चांद्रमोहिमेवर असतानाच रशियानेही चांद्रमोहिमेची घोषणा केली होती. रशियाचे लूना-25 स्पेसक्राफ्ट 11 ऑगस्ट रोजी चंद्राकडे झेपावले होते. लूना-25ही चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर उतरणार होते. मात्र, त्याआधीच 20 ऑगस्ट रोजी यानाचा संपर्क तुटला आणि क्रॅश लँडिग झाले. लूना 25 यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. रशियाची ही मोहिम अपयशी ठरल्यानंतर आता नासाने यासंदर्भात नवीन माहिती दिली आहे.
लूना 25 यान प्री लँडिग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा संपर्क तुटला आणि ते अनियंत्रित होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले. ज्या ठिकाणी रशियाचे यान कोसळले ती जागा आता नासाने शोधून काढली आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसेन्स ऑर्बिटर (LRO) स्पेसक्राफ्टने चंद्रावर एक नवीन क्रेटर (खड्डा) शोधून काढला आहे. लूना 25 दुर्घटनाग्रस्त होण्याची हीच ती जागा असावी, असा अंदाज नासाने बांधला आहे.
24 ऑगस्ट रोजी घेण्यात आला फोटो
लूनर रिकोनाइसेंस ऑर्बिटर कॅमेराचा (एलआरओसी) उपयोग करुन नासाने 24 ऑगस्ट रोजी कथित दुर्घटना स्थळाचा फोटो काढण्यात यश प्राप्त केले आहे. एलआरओसीने त्याच स्थळाचा फोटो याआधी जून 2022मध्ये घेतला होता. दोन्ही फोटोंची तुलना केल्यानंतर नवीन फोटोत चंद्रावर एक खड्डा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 14 महिन्यातच हा खड्डा तयार झाला असल्याचा निष्कर्ष नासाने काढला आहे.
खड्ड्यांबाबत नासाने काय म्हटलं?
नासाने जारी केलेल्या पत्रकाप्रमाणे, चंद्रावर दिसून आलेला हा नवा खड्डा हा लूना 25 यानाच्या लँड होण्याच्या अपेक्षित स्थानाजवळच आहे. रशियाचे यान कोसळल्यामुळेच नवीन खड्डा तयार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन तयार झालेल्या खड्ड्याचा व्यास 10 मीटर इतका आहे तर अंदाजे शून्य शून्य ते 360 मीटर उंचीवर 57.865 अंश दक्षिण अक्षांश आणि 61.360 अंश पूर्व रेखांशावर स्थित आहे.
दरम्यान, नासाचे एलआरओ यान हे जून 2009 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून त्यावर मेरीलँडच्या ग्रीनबेल्टमध्ये नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरद्वारे लक्ष ठेवले जात आहे.