नवी दिल्ली : एक म्हण आहे की, कठीण काळात जो मदतीला धावतो तोच खरा मित्र. कोरोनामुळे असहाय अमेरिकेला भारताने जेव्हा मदत पाठवली, तेव्हा अमेरिकेला ही हेच वाटत असेल. म्हणूनच जेव्हा अमेरिकेला भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन देण्यास सुरवात केली, तेव्हा लगेचच व्हाइट हाऊसदेखील भारताचा फॉलोअर झाला. व्हाईट हाऊसने आता ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फॉलो केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे व्हाईट हाऊस आपल्या ट्विटर अकाउंटवर फक्त 19 जणांना फॉलो करते. त्यापैकी केवळ 5 विदेशी हँडल आहेत आणि ते सर्व भारतीय आहेत.


व्हाईट हाऊसने आता ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि अमेरिकेतील अमेरिकन दूतावास यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना देखील फॉलो केलं आहे. याशिवाय, व्हाईट हाऊस केवळ राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्रपती माइक पेंस आणि अमेरिकन प्रशासनाशी संबंधित इतर काही लोकांनाच फॉलो करतो.


विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेवर झाला आहे, येथे सुमारे चार लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर 10,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची आवश्यकता होती, जी त्या कठीण काळात भारताने प्रदान केली होती.


औषधांच्या पुरवठ्यासंदर्भात भारताने मान्यता दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'विशिष्ट काळात दोन महत्वाचे मित्र जवळ येणं महत्वाचे आहे. एचसीक्यूचा पुरवठा सुरु केल्यामुळे भारत आणि भारतीय जनतेचे खूप खूप आभार. आम्ही ही मदत कधीच विसरणार नाही.'