नवी दिल्ली : जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता संकट मोठे आहे. कोविड १९ चा फैलाव रोखण्यासाठी लावलेला लॉकडाऊन लवकर काढला गेला तर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. जगभरात १७ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीय तर एक लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन लगेच संपवला गेला तर कोरोनाचा झपाट्याने प्रसार होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 


कोरोना व्हायरसचे थैमान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात राहिला, पण लॉकडाऊन काढले तर कोरोना आटोक्यात येण्याच्या परिस्थितीबाहेर जाईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप सुरुच आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांची संख्या १६ लाख ९९ हजारांहून अधिक आहे. जगभरातल्या २१० देशांमध्ये कोरोना व्हायसरचा फैलाव झाला आहे. यात सर्वाधिक फटका हा इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इराण, इग्लंड या देशांना बसला आहे. 


भारतात ७६०० रूग्णांवर उपचार


भारतात कोरोनाच्या ७६००  रूग्णांवर उपचार केले जात आहेत. याआधी ७७४ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर देशभरातल्या मृतांचा आकडा २४९ वर गेलाय. महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक रूग्णांची संख्या नोंदवली गेलीय. राज्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. राज्यात तब्बल ११० रूग्णांचा बळी गेलाय. देशाच्या सर्वच राज्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. 


अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरिक्वीनचा पुरवठा


भारताने अखेर १३ देशांना हायड्रोक्सिक्लोरिक्वीन गोळ्यांचा पुरवठा सुरू केलाय. अमेरिकेची ४८ लाख डॅबलेट्सची मागणी भारताने पूर्ण केलीय. तर ब्राझिल, कॅनडात मिळून भारताने ५० लाख गोळ्या पाठवल्या आहेत. शेजारी राष्ट्रांमध्ये बांगलादेश, नेपाळ, भुतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मॉरिशस आणि मालदीव या देशांनाही भारताने गोळ्यांचा साठा दिलाय. युरोपात स्पेन, जर्मनी, सेशल्स या देशांनाही भारताने गोळ्यांचा पुरवठा केलाय.