मुंबई : पाकिस्तानच्या कैदेत असलेला भारतीय कुलभूषण जाधव याच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या वागणुकीचा एका संवेदनशील पाकिस्तानी पत्रकारानंच निषेध केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WION चॅनलेचे पाकिस्तानी ब्युरो चीफ ताहा सिद्दीकी यांनी  Opinion: Why I am disgusted at the unethical way Pakistan treated Jadhav's family (संपूर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा) या आपल्या लेखात पाकिस्तानी मीडियानं जाधव कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीवर टीका केलीय. 


एका भारतीय न्यूज संस्थेचा पाकिस्तानी पत्रकार म्हणून ताहा सिद्दीकी यांनी हा घटनाक्रम स्वत: पाहिला. याबद्दल लिहिताना ते म्हणतात, 'आमच्या व्यवसायात प्रश्न विचारणं जरुरी समजलं जातं परंतु, त्या दिवशी पत्रकार कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईला प्रश्न विचारत नव्हते, तर त्यांच्यावर आरोप करत होते. जाधव यांना कदाचित शेवटचं भेटण्यासाठी दाखल झालेल्या त्यांच्या आई आणि पत्नीसमोर पत्रकार नारे देत होते... एका रिपोर्टरनं जाधव यांच्या आईला विचारलं की एका दहशतवाद्याची आई असण्याबद्दल त्यांना काय वाटतंय? दुसऱ्या पत्रकारानं जाधव यांच्या पत्नीला विचारलं की, शेकडो पाकिस्तान्यांचा हत्यारा असणाऱ्या त्यांच्या पतीला त्या सपोर्ट करतात का?'


परदेश मंत्रालयानं हे सुनिश्चित केलं होतं की पत्रकार दोन्ही महिलांपासून योग्य अंतरावर उभे राहतील. आम्ही सगळे निश्चितच एका अंतरावर उभे होतो पण मी एका सरकारी अधिकाऱ्याला म्हणताना ऐकलं की काही पत्रकारांना जाधव यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याची संधी मिळेल. जाधव यांची आई आणि पत्नी कारमध्ये येताना पाहून एका पत्रकारानं पाकिस्तान जिंदाबादचे नारे सुरू केले... आणि त्यानंतर इतर पत्रकारांनीही नारेबाजी सुरू केली, असंही ताहा यांनी म्हटलंय. 


केवळ १० मिनिटांत हे सर्व काही घडलं... परंतु, या घटनेनं मला हादरवून टाकलं. हे सगळं चुकीचं होतंय, असं वाटणारा कदाचित मी एकटाच होतो. मी माझ्या सहकारी पत्रकारांवर टीका करणारं एक ट्विटही केलं. हे ट्विट मी माझ्या भारतीय सहकाऱ्यांना हे सांगण्यासाठी केलं की पत्रकारांच्या त्या गर्दीत माझ्यासारखाही एक पत्रकार होता ज्यानं आपल्या सहकाऱ्यांवर यासाठी टीका केली, असं ताहा यांनी म्हटलंय.