....म्हणून तिने बहिणीचे नवऱ्याशी लग्न लावले!
पाकिस्तानातील मुल्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानातील मुल्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील पाकिस्तानी मीडियाने ट्वीटरवर शेअर केला आहे. तर त्याचे झाले असे...
फराज या युवकाचे अलीना हिच्याशी लग्न झाले होते. मात्र तिने काही आठवड्यातच आपल्या नवऱ्यासोबत तिचे लग्न लावून दिले. यामागचे कारण काहीसे पचनी पडणारे नसून समाज्यात देखील त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
लग्नानंतर मन रमत नसल्याने...
या लग्नाबद्दल जेव्हा अलीनाला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, माझे माझ्या बहीणीशिवाय येथे मन लागत नव्हते. मी आणि माझी चुलत बहीण अलिस्मा लहानपणापासून सोबत आहोत. आम्ही दोघी एकाच शाळेत शिकलो, प्रत्येक काम एकत्र केले. त्यामुळे एकमेकींची खूप सवय झाली आहे. लग्नानंतर तिच्याशिवाय माझे मन रमत नव्हते. नवऱ्यातही मन रमत नव्हते. काही आठवडे देखील मी कसेबसे काढले. मात्र त्यानंतर मी बहिणीला घरी बोलवले व माझ्या नवऱ्याशी तिचे लग्न लावून दिले. आता अलिस्मा माझी सवत असली तरी मला त्याचे दुःख नाही.
दोघींचे खूप जमते
अलीनाने सांगितले की, आमच्या दोघींचे खूप पटते. तर अलिस्मा म्हणते की, मी माझ्या बहिणीपासून दूर राहून जिंवत राहू शकले नसते. या लग्नानंतर दोघीही खूप खूश आहेत. मात्र त्या दोघींच्या या निर्णयाने समाज त्यांचा शत्रू बनला आहे.
सोशल मीडियावर लग्नाची खिल्ली
अलिस्माच्या घरचे आता फराजला शोधत आहेत. कारण हा विवाह पचनी न पडल्याने फराजच्या जीवाला धोका असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. तर दूसरीकडे सोशल मीडियावर या लग्नाची विविध प्रकारे खिल्ली उडवली जात आहे. काही लोग इस्लाम रिती-रिवाजांवर निशाणा साधत आहेत. तर काहीजण फराजला नशीबवान समजत आहेत. तर काहीजण पती-पत्नीच्या वैयक्तिक बाबींमध्ये दखल न देण्याचा सल्ला देत आहेत.