लंडन : विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटिश पोलिसांनी गुरुवारी अटक केलीय. दूतावासानं पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर इक्वाडोर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी असांजे याला ताब्यात घेतलं. असांजे यानं २०१२ पासून इक्वाडोर दूतावासाकडे शरण घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४७ वर्षयी ज्युलियन असांजे याला मेट्रोपॉलिटन पोलीस सर्व्हिसनं इक्वाडोर दूतावासमधून ११ एप्रिल रोजी अटक करण्यात आलीय.


इक्वाडोरनं असांजेला दिलेली शरण परत घेतल्यानंतर राजदूतांनी पोलिसांना दूतावासात बोलावून घेतलं. याच ठिकाणी असांजे याला अटक करण्यात आली.


२०१३  साली असांजे यांनी विकिलिक्सच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले होते. त्याच्या या गौप्यस्फोटांमुळं अमेरिकाही अनेकदा अडचणीत आली होती. त्यानंतर असांजे याच्यावर स्वीडनमधल्या दोन महिलांनी बलात्काराचा आरोप केला होता. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी स्वीडनची सुरक्षा यंत्रणा असांजे याची चौकशी करणार आहे.


स्वीडन प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी २०१२ सालापासून असांजे हा इक्वाडोर दूतावासात शरणार्थी म्हणून राहत होता. असांजे याला आपल्याला अमेरिकेकडे सोपवलं जाण्याचीही भीती वाटत होती. म्हणून त्यानं इक्वाडोर दूतावासात शरणागती पत्करली होती. अमेरिकेत संघीय वकिलांकडून 'विकीलिक्स'च्या अनेक धक्कादायक खुलाशांची चौकशी सुरू आहे. 


मूळचा ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या असांजे यानं २०१२ मध्ये लंडनच्या इक्वाडोर दूतावासाकडे आश्रयाची मागणी केली होती. तेव्हापासून तो तिथंच राहत होता. 


पोलिसांनी अटक केल्यानंतर असांजे याला लंडनच्या एका केंद्रीय पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्याला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात येईल. 


इक्वाडोरनं असांजे याच्यावर राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती लीक करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर इक्वाडोर आणि असांजे याचे संबंध बिघडले होते. असांजे यानं शरणागतीच्या अटींचं उल्लंघन केल्याचं मोरेने यांनी म्हटलं होतं. 


परंतु, या अटकेच्या अगोदर मोरेनो यांनी ब्रिटनसमोर एक अट ठेवली होती. असांजे याला छळ किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकेल अशा कोणत्याही देशाकडे हस्तांतरीत करण्यात येऊ नये, असं त्यांनी ब्रिटनला बजावल्याचं म्हटलंय.