वाघा बॉर्डर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवर पोहोचले आहेत. मात्र, भारताच्या ताब्यात देण्यात पाकिस्तानकडून मुद्दामहून दिरंगाई करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून कागदोपत्री प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अभिनंदन अजून भारतात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यानंतर पाच वाजता अभिनंदन यांची सुटका करत भारताकडे सोपविले जाणार होते. रात्री ८.३० वाजले तरी अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. दरम्यान, भारताने तात्काळ मागणी करत अभिनंदन यांना भारतात पाठवण्यात यावे, अशी मागणी केली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे, अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.

पाकिस्तानकडून वेळकाढूपणा करण्यात येत आहे. भारताकडून सर्व कागदपत्रे देण्यात आली आहे. मात्र, छाननीच्या नावाखाली पाकिस्तानकडून वेळ काढण्यात येत आहे. त्यामुळे वाघा बॉर्डरवर दाखल होऊनही अभिनंदन भारताच्या ताब्यात देण्यात आलेले नाही.