बर्लिन : आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला लाखो रुपयांची लॉटरी लागावी आणि आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात. यासाठी अनेकजण लॉटरी खरेदी करून आपलं नशीब आजमावत असतात. काहींचं नशीब खुलतं तर काहींची निराशा होते. एखाद्या व्यक्तीचं नशीब जोरावर असेल तर त्याला अगदी स्वप्नात वाटणाऱ्या गोष्टीही प्रत्यक्षात घडतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनीच्या बर्लिनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचं नशिब असंच अचानक पालटलं. या महिलेने लॉटरीचं तिकिट काढलं पण यानंतर ती ही गोष्ट विसरून गेली. अनेक दिवस लॉटरीचं तिकिट ती आपल्या पर्समध्ये घेऊन फिरत होती. आपल्याला अब्जो रुपयांची लॉटरी लागली आहे, याची तिला साधी कल्पनाही नव्हती.


तब्बल आठवडाभर लॉटरीचं तिकिट तिच्या पर्समध्ये होतं. आठवडाभरानंतर तीला समजलं की आपल्याला लॉटरी लागली आहे. यानंतर बक्षीसाची रक्कम ऐकून तीला धक्काच बसला. थोडे-थोडके नाही तर ही महिला तब्बल तीन अब्ज रुपयांची मालकिन बनली होती. 


लोट्टो बायर्न नावाच्या लॉटरी कंपनीच्या म्हणण्यानुसार, 45 वर्षांची ही महिला 9 जून रोजी सोडतीच्या एकमेव विजेता ठरल्या. विजेती ठरल्यानंतर ती महिला म्हणाली, 'मला आता हा विचार करून चक्कर येते की, मी निष्काळजीपणाने अनेक दिवस अब्जो रुपयांची लॉटरी पर्समध्ये घेऊन फिरत होती'


बक्षीसाची रक्कम आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी वापरण्याबरोबरच पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा या महिलेनं व्यक्त केली आहे.