मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या त्या महिलेला अटक
सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून रस्त्यात चालण्याचा व्हिडिओ तयार करणं एका मॉडेलला महागात पडलंय.
रियाद : सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून रस्त्यात चालण्याचा व्हिडिओ तयार करणं एका मॉडेलला महागात पडलंय. बुरसटलेल्या विचारांचे राज्यकर्ते असलेल्या या देशात मॉडेलला जेलची हवा खावी लागलीये. खुलूद असं स्नॅपचॅट नेम असलेल्या या मॉडेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर सौदीमध्ये जोरदार टीका सुरू झाली.
कट्टरपंथी नेटिझन्सनी मॉ़ड़ेल खुलूदवर कारवाई करा, अशा आशयाचा हॅशटॅगच सुरू केला. महिलांनी कायम बुरख्याआडच राहिलं पाहिजे, असा अट्टाहास असलेल्या या देशामध्ये मग या मॉडेलला अटक करण्यात आली.
या मॉडेलचं खरं नाव समजलेलं नाही. हा व्हिडिओ उषाइकीर नावाच्या एका पुरातन गावामध्ये चित्रित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मुस्लिमांसाठी पवित्र स्थळं असलेल्या मक्का आणि मदिनाच्या या देशात महिलांवर अनेक निर्बंध आहेत. त्यांनी विशिष्ट कपडेच वापरले पाहिजेत असा तिथला कायदा आहे आणि महिलांना वाहन चालवण्यासही बंदी आहे. अशा स्थितीत खुलुदच्या या व्हिडिओमुळे वादंग माजला नसता तरच नवल. तिथले राज्यकर्तेही महिलांच्या दमनासाठी तयार असल्यामुळे तिला अटक करण्यात कोणतीही दिरंगाई झाली नाही.