नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. जागतिक बँकेने भारताला एक बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केले आहे. हे सामाजिक संरक्षण पॅकेज आहे. यापूर्वी कोरोनाशी युद्धासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपत्कालीन मदत म्हणून एक अरब डॉलरची मदत जाहीर केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बँकेचे हे एक अब्ज डॉलरचे (सुमारे ७६०० कोटी) पॅकेज देशातील कोरोना रुग्णांच्या चांगल्या तपासणीसाठी, कोविड रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच प्रयोगशाळेसाठी इमारत बांधण्यासाठी वापरले जाऊ शकते. जागतिक बँकेने यापूर्वी २५ विकसनशील देशांना पॅकेज देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.


याआधी न्यू डेव्हलपमेंट बँकेने भारताला एक अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत जाहीर केली. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी हे कर्ज देण्यात आलं होतं.


याव्यतिरिक्त, एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) कोरोनाच्या संकटात भारताला १.५ अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. कोव्हीड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनो विषाणूमुळे होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्याच्या लढाईत भारत सरकारला सामील करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.


विशेष म्हणजे भारतातील कोरोनाचे आकडे सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या सुमारे ८२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. एकूण मृतांचा आकडा २६५० च्या जवळपास पोहोचला आहे. तर बरे झालेल्या लोकांची संख्या २७ हजारांहून अधिक आहे.