International Day of Happiness 2023: `हे` आहेत जगातील 5 आनंदी देश; भारताचा क्रमांक कितवा?
World Happiness Day: आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. किंबहुना प्रत्येकाच्या आनंदाच्या परिभाषाही तितक्याच वेगळ्या आहेत. आता यापैकी कोणती परिभाषा तुम्हाला लागू होते हे तुम्हीच ठरवा....
International Day of Happiness 2023: जगभरात दर दिवसाचं काहीतरी महत्त्वं आहे. एखादा कार्यक्रम, एखादी घटना, एखाद्या व्यक्तीचा जन्म, एखाद्याचं यश अशी प्रत्येक लहानमोठी गोष्ट साजरा करत त्यातून संपूर्ण जगालाच संदेश देण्याचं काम हे विविध दिवस / दिन करत असतात. असाच एक दिवस म्हणजे International Day of Happiness, थोडक्यात जागतिल आनंद दिवस. (World Happiness Day know 5 Happiest Countries In The World)
United Nations General Assembly (UNGA) च्या वतीनं 2013 पासून हा दिवस 20 मार्च रोजी साजरा केला जाऊ लागला. जागतिक स्तरावर प्रत्येकातच्याच आयुष्यात असणाऱ्या आनंदाचं महत्त्वं पटवून देणं हा या दिवसाचा मुख्य हेतू. वय, वर्ग, जात, पंथ किंवा इतर कोणत्याही पठडीत मोडणाऱ्या कोणाही व्यक्तीला आनंदी राहण्याचा हक्क आहे किंबहुना आनंदी राहणं हाच त्यांच्या आयुष्याता एकमात्र हेतू असणं अपेक्षित आहे असा सुरेख संदेश हा दिवस देतो.
जगभरातील नागरिकांच्या आयुष्याकडे पाहण्याचा सर्वसमावेशक दृष्टीकोन या दिवसाच्या माध्यमातून दिला जातो. विकास, गरीबी दूर करण्यासाठीचे मार्ग, आनंद आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं हित या सर्व गोष्टींना इथं महत्त्वं दिलं जातं. जगातील 146 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
यामध्ये पहिल्या पाच देशांमध्ये अव्वल स्थानी आहे फिनलँड. सलग पाचव्या वर्षीसुद्धा फिनलँडनं (Finland) हे स्थान कायम ठेवलं आहे. त्यामागोमाग डेन्मार्क (Denmark) आणि आईसलँड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर, स्वित्झर्लंड (Switzerland) आणि नेदरलँड्स या देशांचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक येतो. जगातील सर्वात कमी आनंदी देश म्हणून अफगाणिस्तानच्या नावाची नोंद 2022 मध्ये करण्यात आली होती.
कोणत्या निकषांवर होते आनंदी देशांची निवड?
GDP per capita, सामाजिक आधार, आरोग्यदायी जीवनशैली आणि आयुर्मान, जीवनासंदर्भातील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार या निकषांवर जगातील आनंदी देशांची निवड केली जाते.
भारताचा क्रमांक कितवा माहितीये?
जगात विकसनशील राष्ट्रांच्या यादीत येणाऱ्या भारताला मात्र या आनंदी देशांच्या यादीत समाधानकारक स्थान मिळालेलं नाही. कारण, देश सर्वांगीण विकास करत असला तरीही तो जगातील किमान आनंदी राष्ट्र म्हणूनच समोर येत आहे. 2022 मधील जागतिक आनंदी राष्ट्रांच्या अहवालानुसार या यादीत भारत 136 व्या स्थानावर आहे. शेवटून दहाव्या स्थानावर असणाऱ्या भारतामागे शेजारी राष्ट्र नेपाळ, चीन, बांगलादेश आणि श्रीलंकेचा क्रम येतो.
हेसुद्धा वाचा : Deja Vu: माझ्यासोबत हे आधीही घडलंय! तुम्हाला असा भास कधी झालाय का? यामागे लपलं आहे वैज्ञानिक कारण
वेगानं होणारं शहरीकरण, गरीबी, शहरांची होणारी घुसमट, प्रदूषणातील लक्षणीय वाढ, लोकसंख्या वाढ, आरोग्य सुविधांचे वाढलेले दर, महिलांविरोधात वाढलेले गुन्हे, समाजातील दुर्बल घटकांवर होणारा अन्याय या आणि अशा इतरही काही घटकांमुळे या यादीत भारत इतक्या खालच्या क्रमांकावर घसरला आहे. विकसनशील राष्ट्र म्हणून देशाती प्रगती होताना आनंदी राष्ट्रांच्या यादीत झालेली अधोगती तुम्हाला पटतेय का?