Rice Price Hike: मागील काही दिवसांपासून टोमटोच्या वाढत्या दरांनी अनेकांचीच भूक पळवली आहे. जेवणातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून वापरल्या जाणाऱ्या या टोमॅटोचे दर कमी कधी होणार हाच प्रश्न नागरिकांना आणि त्याहुनही स्वयंपाकघराचा ताबा असणाऱ्या गृहिणींना पडलेला असतानाच आता घराचं बजेट बिघडवण्याची चिन्हं दाखवणारी बातमी समोर आली आहे. कारण आता ताटातून भातच गायब होण्याची भीतीही अनेकांनाच सतावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही काळापासून तांदळाच्या दरानं गाठलेली उंची यासाठी कारणीभूत ठरू शकते. कारण जगभरात तांदळाचे दर विक्रमी फरकानं वाढल्याची बाब लक्षात आली आहे. आशियातील बाजारपेठांवर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. भारतातही याचे परिणाम पाहायला मिळत असून, सध्याच्या घडीला बासमती तांदूळ वगळता इतर प्रकारच्या तांदळाची निर्यात बंद करण्यात आली आहे. थायलंडमध्ये दुष्काळामुळं तांदळाचं उत्पन्न कमी झालं आणि त्याचे परिणाम आता जागतिक स्तरावर दिसून येत आहेत. 


भारतानं उचलली कठोर पावलं 


जागतिक स्तरावर उदभवलेला तांदळाचा प्रश्न पाहता भारतातून बासमती वगळता इतर तांदळाची निर्यात थांबवण्यात आली आहे. ज्यामुळं वैश्विक स्तरावर तांदळात दरवाढ नोंदवली जात आहे. भारताच्या या निर्णयाचा जागतिक पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, थायलंड आणि तत्सम देशांमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. जगभरातील तांदूळ निर्यातीमध्ये भारताचा 40 टक्के वाटा असतो. पण, सध्याचं अस्थिर वातावरण पाहता मात्र भारतानंच तांदूळ निर्यातीतून काढता पाय घेतल्यामुळं मोठं संकट ओढावण्याचे संकेत आहेत. 


हेसुद्धा पाहा : RBI कडून वापरल्या जाणाऱ्या Repo Rate, CRR या शब्दांचा नेमका अर्थ काय? समजून घ्या 


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार थाय राइस एक्सपोर्टर्स एसोसिएशननं यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली जिथं तुकडा थाय राईसच्या 5 टक्के मालाची किंमत 2008 नंतर सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. जिथं सध्या त्याच्यासाठी प्रति टन 648 डॉलर इतकी रक्कम मोजली जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ अंदाजात घ्यायची झाल्यास हा आकडा तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्याचं लक्षात येत आहे. 


तांदळाच्या दरवाढीचा फटका कोणाला? 


आफ्रिका आणि आशिया खंडांमधील देशांसाठी तांदूळ हा प्रमुख धान्यांपैकी एक. कोट्यवधी नागरिकांच्या आहारातील हा महत्त्वाचा घटक. पण, आता त्यात दरवाढ झाल्यामुळं अनेक देशांवर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे. ज्यामुळं तांदळाच्या आयात रकमेतही वाढ होण्याची चिन्हं आहेत. सध्याच्या घडीला अल निनोमुळं थायलंडमधील तांदूळ उत्पादनावर वाईट परिणाम झाले. सध्याच्या घडीला थायलंडमधील परिस्थिती पाहतता तिथं शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणारी पिकं घ्यावीत असं आवाहन सरकारनं केलं आहे. आता आशिया आणि आफ्रिकेतील देश या तांदळाच्या समस्येवर कोणता तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं.