चहा- जेवणाच्या ब्रेकमध्ये ठेवा शारीरिक संबंध; राष्ट्रपतींचं अजब आवाहन, कारण काय?
Russian Population : ऑफिसमध्ये चहा-कॉफी किंवा जेवणासाठी मिळणाऱ्या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध ठेऊ शकतात, असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Russian Population : ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना चहा-कॉफी किंवा जेवणासाठी ब्रेक दिला जातो. या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध (Physical Relation) ठेऊ शकतात. असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर (Fertility Rate) वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी हे आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी आठ मुलांना जन्माला घालण्याचा सल्लाही दिला होता. रशियन लोकसंख्येचे संरक्षण हा सध्याचा सर्वात मोठा राष्ट्रीय विषय असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे.
रशिया-युक्रेन युद्ध
रशिया-युक्रेन युद्धाने आता तिसऱ्या वर्षात पदार्पण केलं आहे. रशियाने युक्रेनच्या 18 टक्के भू-भागावर कब्जा केला आहे. असं असलं तरी युक्रेनने माघार घेतलेली नाही. त्यामुळे युद्ध कधी संपणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन एका गोष्टीने चिंतित आहेत. युद्धामुळे रशियाची लोकसंख्या घटली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुतीन यांनी कर्मचाऱ्यांना चहा आणि जेवणाच्या ब्रेकमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचं आवाहन केलं आहे. प्रजनन दर वाढवण्यासाठी राष्ट्रपती यांनी हा अजब सल्ला दिला आहे.
रशियात घटता जन्मदर
रशियामध्ये प्रजनन दर प्रति महिला 1.5 मुलांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे रशियामध्ये लोकसंख्या स्थिरतेचे संकट निर्माण झाले आहे. एवढेच नाही तर युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर सुमारे दहा लाख रशियन नागरिकांनी देश सोडला आहे. त्यापैकी बहुतांश तरुण आहेत. रशियाचे आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्टोपालोव्ह यांनीही पुतीन यांच्याप्रमाणेच ऑफिसमधला लंच ब्रेक, टी-कॉफी ब्रेकचा उपयोग शारीरिक संबंधांसाठी करावा असा सल्ला दिला आहे. जे कर्मचारी कामात व्यस्त असतात, मुलांना जन्म देण्यासाठी आणि त्यांचं संगोपन करण्यासाठी वेळ मिळत नाही, असं म्हणतात. ते कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या टाळत आहेत. तुमच्याकडे खरच वेळ नसेल तर कामाच्या ब्रेकमध्ये शारीरिक संबंध ठेवा' असं आवाहन रशियन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
8 मुलांना जन्म द्या
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी प्रजनन दर वाढवण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या वर्षी देखील पुतीन यांनी रशियन महिलांना कमीत कमी आठ मुलांना जन्म द्या आणि कुटुंब वाढवा असं आवाहन केलं होतं. आपल्या देशातील अनेक वांशिक गटांमध्ये अशी परंपरा आहे. अनेक पिढ्या एकत्र राहत होत्या आणि घरात चार, पाच किंवा त्याहूनही अधिक मुले होती. आपल्या रशियन समाजात, आजी-आजोबांच्या काळातही सात, आठ किंवा त्याहून अधिक मुले असणे सामान्य होतं, असं उदाहरण पुतीन यांनी दिलं.
रशियात 1999 नंतर जन्म दर प्रचंड घटला आहे. या वर्षात जून महिन्यात रशियात एका लाखाहून कमी मुलांचा जन्म झाला. तर 2024 च्या पहिल्या सहा महिन्यात सहा लाख मुलांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 16000 ने कमी आहे. जानेवारी ते जूनदरम्यान मृत्यू दर पाहिला तर सहा महिन्यात सवा तीन लाख लोकांचा मृत्यू झाला.