France Golden Owl Statue: जगातील सर्वात मौल्यवान खजिन्याचा शोध अखेर पूर्ण झाला आहे. 31 वर्षांपूर्वी एका देशात घुबडाला दफन करण्यात आलं होतं. त्याला शोधण्यासाठी 1993 साली एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अखेर ती स्पर्धा संपन्न झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्यकारक म्हणजे त्या घुबडाला शोधण्यासाठी लाखो स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. जो व्यक्ती या घुबडाला शोधेल खजिना त्यालाच मिळेल, अशी अट होती. अखेर 31 वर्षांनंतर फ्रान्समध्ये दफन करण्यात आलेल्या घुबडाची मूर्ती शोधण्यात यश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील लोकांनी 1993 पासून या रहस्यमयी घुबडाचा शोध घेत होते. तीन दशकांपूर्वी फ्रान्समध्ये या घुबडाला शोधण्यासाठी लोकांनी रात्रंदिवस एक केला होता. या खजिन्याला गोल्डन आउल असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे, घुबडाला शोधण्यासाठी एक पुस्तकही देण्यात आलं होतं. त्यात स्पर्धकांना 11 कोडी घालण्यात आली होती. त्यानंतर स्पर्धकांना 12 वा सर्वात मोठं कोडंदेखील सोडवायचे होते. मॅक्स वॅलेन्टिन यांनी सुरू केलेली सिरीज समजून घेणे खूप कठिण होते. डोकं चक्रावणारी ही कोडी सोडवण्यासाठी अनेकांना डोकेफोड करावी लागली. जेणेकरुन ते घुबडाच्या कांस्य मूर्तीपर्यंत पोहोचू शकतील. 


मॅक्स वॅलेन्टिन यांनी घुबडाची ही मूर्ती फ्रान्समध्येच दफन करुन ठेवली होती. या रहस्याशी संबंधित पुरावे 1993मध्ये प्रकाशित झालेल्या ऑन द ट्रेल ऑफ द गोल्डन आऊलमध्ये देण्यात आले होते. हा काही नैसर्गिक खजिना नसून फक्त एका स्पर्धेसाठी हा खजिना शोधायचा होता. ऑन द ट्रेल ऑफ गोल्डन आउल पुस्तकाचे चित्रकार मायकल बेकर यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहली होती. त्यानुसार, गोल्डन घुबडाची प्रतिकृती शोधण्यात आली आहे. शोध घेणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार म्हणून सोन्याचे घुबड मिळणार आहे. ज्याची किंमत 1 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे. 



ही स्पर्धा कोणी जिंकली हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. मात्र, विजेता कोण आहे आणि ही स्पर्धा कोणी जिंकली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाहीये. या स्पर्धेचे मालक व्हॅलेंटीन यांचे 2009 मध्ये निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यानंतर बेकर यांनी या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारली. खजिना शोधण्याच्या नियमांकडे लक्ष दिले तर ही 12 कोडी कोणी आणि कशी सोडवली याचा खुलासा करण्याची गरज आहे, मात्र याची काहीच माहिती समोर आलेली नाहीये. या स्पर्धेचे उत्तर फक्त व्हॅलेंटाइनला माहित होते. कुटुंबीयांनी सीलबंद अहवालात ते उत्तर ठेवून दिले आहे.