कोरोनाआधी वुहान लॅबचे 3 रिसर्चर्स आजारी, अमेरिकी गुप्त रिपोर्टमध्ये धक्कादायक पुरावे
हा विषाणू नक्की कुठून आला ? तो कसा तयार झाला? याबाबतीत अजून ठोस माहिती जगासमोर आलेली नाही.
ब्रिटन : कोरोनाच्या साथीमुळे जगभरात आता पर्यंत 34 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु हा विषाणू नक्की कुठून आला ? तो कसा तयार झाला? याबाबतीत अजून ठोस माहिती जगासमोर आलेली नाही. परंतु जगातील अनेक देशांचे असे मानने आहे की, या धोकादायक व्हायरस तयार होण्याचे ठिकाण हे चीनमधील 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' आहे. काही देशांचा असा दावा आहे की, चीनने या साथीच्या रोगा संबंधित बरीच महत्वाची माहिती जगापासून लपवून ठेवली आहे.
परंतु अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते नोव्हेंबर 2019 मध्ये 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' या प्रयोगशाळेत काम करणारे तीन संशोधक इतके आजारी पडले होते की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी कोविड -19 च्या नावाबद्दल किंवा अस्तित्वा बद्दल संपूर्ण जगाला माहिती नव्हती. त्यामुळे चीनवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन टीमला तपासणी दरम्यान पाठिंबा न दिल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवून ठेवल्याचा देखील आरोप आहे.
या गुप्त अहवालात वुहान लॅबच्या आजारी संशोधकांची संख्या, त्यांच्या आजारी पडण्याच्या वेळा आणि रुग्णालयाशी संबंधित तपशीलवार माहिती या अहवालात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या एक दिवस आधी हा अहवाल आला आहे. ज्यात डब्ल्यूएचओने कोरोना विषाणूच्या उत्पत्ती संदर्भात चौकशी करण्याची चर्चा केली.
अमेरिकन सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तावर काही भाष्य केले नाही, परंतु ते म्हणाले की, बायडन प्रशासन 'कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासच्या गोष्टीवर गंभीर आहे.' यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेची टीम वुहान येथे महामारी संबंधीतील माहिती मिळवण्यासाठी गेले होते. परंतु डब्ल्यूएचओने म्हटले की, कोरोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतूनच जगात पसरला हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला 'चायनीज व्हायरस' आणि 'वुहान व्हायरस' असे म्हटले आहे परंतु चीनने यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे.