असं असावं भाषण कौशल्य

प्रत्येकाची बोलण्याची ढब असते. कुणी आवेशात बोलतं, तर कुणी संयतपणे. आपापल्या मूल शैलीला अनुसरून बोलावं. उगाच दुसऱ्याची कॉपी करू नये.

Updated: Sep 6, 2018, 02:30 PM IST
असं असावं भाषण कौशल्य title=

गौरी खेर : समूहासमोर घडाघडा बोलता येणं हे एक कौशल्य आहे, जे एरवी घडाघडा बोलणाऱ्या सर्वांना जमत नाही. कुशल वक्ता असण्याचं महत्त्व असू शकतं, हे कौशल्य किती मोलाचं असू शकतं, हे अनेक जणांना पटलेलं नसतं. 

मार्कांच्या मागे धावणाऱ्या या जगात, आपल्या वक्तृत्वकौशल्याचं महत्त्व आपण विसरून गेलो आहोत. खरे तर आपण इतिहास काळापासून बघत आलो आहोत की बहुतांश नेते हे उत्तम वक्तेही होते. त्यांच्या भाषणांनी लोकांवर प्रभाव पडत असे. आजही वक्तृत्वाचं महत्त्व तितकंच टिकून आहे. 

‘पब्लिक स्पीकिंग’च्या पाट्या आज आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. ‘कॉन्फिडन्टली बोला’, ‘संभाषणकौशल्य शिका’ असं अनेक जाहिरातींमध्ये लिहिलेलं असतं. किती जण कुशल वक्ता होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात? भरमसाठ फी भरून, अशा क्लासला जाऊन शिकूनही काहींना हे कौशल्य का प्राप्त होत नाही, हा प्रश्न पडतो. 

एव्हढं नक्की की, तरुणांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत आपलं वक्तृत्व सुधारावं, यासाठी मुद्दाम प्रयत्न केले तर त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात लाभ होऊ शकतो. त्यासाठी क्लासला गेलं पाहिजे असं नाही. आपण स्वतः ही कला आत्मसात करू शकतो. आपण आपलं वक्तृत्व प्रयत्नपूर्वक सुधारू शकतो. त्याकरिता काही टिप्स -

आपल्याला काय बोलायचं आहे हे आधी ठरवलं पाहिजे. ‘नॉलेज इज पॉवर’ हे इथे अगदी खरं ठरतं. ज्या विषयावर बोलायचं, त्या विषयाचं ज्ञान आपल्याकडे आहे का किंवा नक्की कोणते मुद्दे/मतं मांडायची आहेत, ही जाणीव बरंच बळ देते.

आपले श्रोते कोण आहेत, मीटिंगच्या वेळचं भाषण ऐकायला आलेले किंवा कॉलेजमधील वक्तृत्व ऐकायला आलेले श्रोते वेगवेगळे असतात. त्यांचं वय, सर्वसाधारण बौद्धिक पातळी, वक्तृत्वाच्या वेळेचं आणि स्थळाचं भान ठेवून शब्द आणि ‘टोन’ बदलावे लागतात.

आपण काय बोलणार आहोत, ह्याचे मुद्दे व रचना तयार करावी. मग त्यात आपण भाषणाचा मुख्य उद्देश, मूळ कल्पना भरू शकतो. भाषणाचा मसुदा लिहून काढावा, म्हणजे वाचून सराव करायलाही सोपं जातं.

प्रत्यक्ष जेव्हा बोलायची वेळ येईल, तेव्हा भाषण वाचून काढू नये. ते लक्षात ठेवावं. त्यासाठी मुख्य मुद्दे एका छोट्या कागदावर (क्यू कार्ड्स) लिहून काढावे.
बोलण्याचा सराव करणं अगदी महत्त्वाचं आहे. ‘Practice makes  Perfect’ ही इंग्रजी म्हण लक्षात ठेवा.

नवख्या वक्त्याला मंचावर गेल्यावर एकदम गांगरून गेल्यासारखं वाटू शकतं. आपल्यावर प्रकाशझोत असेल तर समोरचे श्रोते नीट दिसत नाहीत. अशावेळी ‘नर्व्हस’ न होता, बावचळून न जाता, अगदी शांतपणे सुरुवात करावी. जसा जसा धीर येईल, तशी हळूहळू लय सापडते.  

आपल्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्या बोलण्यातून इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपलं भाषण आपला ठसा उमटवून जातं. आपल्यात जे नाही, ते उगाचच छाप पाडण्यासाठी करू नये. उदा. भाषणात विनोद करणे  सर्वांना जमत नाही, त्यामुळे ‘जोक’ मारणं हा प्रकार एकदम ‘फुस्स’ होऊन जाऊ शकतो. किंवा भाषणात मोठ्यांचे ‘कोट’ वापरणे, हेही सर्वाना जमेलच असं नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं बोलावं.

प्रत्येकाची बोलण्याची ढब असते. कुणी आवेशात बोलतं, तर कुणी संयतपणे. आपापल्या मूल शैलीला अनुसरून बोलावं. उगाच दुसऱ्याची कॉपी करू नये.