Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस; वापरा 'या' ट्रिक, पैशांची होईल बचत

Gas Cylinder News : दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत दिसतात. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. जर तुम्हाला जास्त काळ घरगुती गॅस सिलेंडरची बचत करायची असेल तर काही टिप्स फॉलो करा... 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 17, 2024, 05:30 PM IST
Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस; वापरा 'या' ट्रिक, पैशांची होईल बचत title=

Gas Cylinder News in Marathi : आजकाल इंधनाची बचत हा एक मोठा भाग बनला आहे. रॉकेल, पेट्रोल डिझेल हे जरी नैसर्गिक स्त्रोत असले तरी त्यांचे साठे मर्यादितच आहेत. म्हणून ते काटकसरीने वापरले तर ते आपल्यासाठीच फायदेशीर ठरु शकतील. तर दुसरीकडे स्वयंपाकघरात पूर्वी लाकडं, कोळसे वापरुन स्वयंपाक केला जायचा. पुढं स्टोव्ह आले. फर्रर्र आवाज करणारा स्टोव्ह वापरणार घर आता एखादंच असेल. त्या आवाजावर मात करुन मंद तेवणारे वातीचे स्टोव्ह आले. यानंतरच्या काळात आले गॅस सिलिंडर..

गॅसच्या वापरानं वेळेची बचत होते, आवाजाचा त्रास नाही. पण इंधनाची बचत कशी करावी ही समस्या आजही कायम आहे. इंधनाचे वाढते दर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे दर सतत बदलत असतात त्यामुळे आपल्याकडंही हे दर महागच असतात. एका महिन्यात आणि कधीकधी महिन्याच्या आतच संपणारा गॅस हा कधी कधी आपलं आर्थिक गणित चुकवू शकतो. कारण सरकार फक्त बारा सिलिंडर वर सबसिडी देतं. तेरावा सिलिंडर आपल्याला जास्त पैसे देऊनच विकत घ्यावा लागतो. मग यावर उपाय काय? तर सांभाळून बेतानेच काटकसरीने गॅस वापरणे. याशिवाय अजूनही काही उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया...

सिलिंडर घरी आणल्यानंतर प्रथम सिलिंडरचे वजन करुन ठेवा. वजन ठिक असेल तर चांगले अन्यथा सिलिंडर बदलावा. कारण सिलेंडर जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल. तसेच, ज्या दिवशी सिलिंडर घरी आणला ती तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवा. हे तुम्हाला सिलिंडर किती दिवस वापरले याची आठवण करून देईल. तीच स्थिती कायम ठेवल्यास सिलिंडर किती दिवस टिकेल याची कल्पना येईल.

गॅस बर्नर नियमितपणे स्वच्छ करा जेणेकरून ते योग्य प्रमाणात वापरले जाईल. बर्नरमध्ये कचरा किंवा काही घाण असल्यास त्याचा रंग निळ्या ऐवजी किंचित पिवळा दिसतो.अशावेळी बर्नर स्वच्छ करा.बर्नर स्वच्छ ठेवण्यासाठी गॅस बर्नर गरम पाण्यात ठेवा आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला. त्यात ही संपूर्ण इनोचे पॅकेट ठेवा. दोन्ही बर्नर मिश्रणात तीन तास भिजवून ठेवा आणि नंतर ब्रशने बर्नरचा तळ स्वच्छ करा.

स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पू्र्वतयारी आधीच करुन ठेवा.  जसे की भाज्या कापणे, लसूण निवडणे, मसाले किचनवर काढून ठेवा. त्यामुळे फोडणी देताना गॅस कमी जास्त करावा लागणार नाही. कारण गॅस कमी जास्त केल्याने वाया जाण्याची शक्यता जास्त असते. 

शक्य असल्यास स्वयंपाक करण्यासाठी कुकर वापरा. त्यामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा वापर कमी होईल आणि गॅससोबतच वेळेचीही बचत होईल. तसेच डाळ आणि तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान अर्धा तास बाजूला ठेवा. यामुळे डाळ आणि भात लवकर शिजवण्यास मदत होईल.

गॅस वापरताना योग्य भांडी वापरा. आवश्यकतेनुसार पात्राचा आकार निवडा. जर शेगडीमध्ये किंवा गॅसच्या नळीमध्ये थोडी फार लिकेज  होत असेल तर त्वरित दुरुस्त करा. यामुळे गॅस पास होणार नाही. तसेच रेग्युलेटर आणि गॅस पाईप वेळोवेळी बदलले पाहिजेत. गॅसचा वापर केल्यानंतर रेग्युलेटर व्यवस्थित बंद करा. त्यामुळे गॅसचा अपव्यय होणार नाही आणि दिवसा गॅसचा वापर अधिक होईल.