देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश, यांना डच्चू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उद्या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. 

Updated: Jun 15, 2019, 11:50 PM IST
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश, यांना डच्चू title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उद्या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलारांसह भाजपच्या दहा जणांना संधी मिळाणार आहे. तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, भ्रष्टाचाराचा आरोप झालेले प्रकाश मेहत यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार आहे. तर विष्णू सावरा, राजकुमार बडोले यांचीही गच्छंती अटळ असून पोटे, कांबळे, अत्राम यांनाही नारळ देण्यात येणार आहे.

फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. तेरा जण उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्या सकाळी अकरा वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपाचे आमदार अतुल सावे, मोर्शीचे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे, संजय कुटे, योगेश सागर आणि रिपाइं नेते अविनाश महातेकर यांचा समावेश आहे. 

Maharashtra CM Devendra Fadnavis meets Uddhav Thackeray ahead of proposed Cabinet expansion

तर नागपूरचे परिणय फुके आणि यवतमाळच्या राळेगावचे अशोक उईके यांचा मंत्रिमंडळातले अनपेक्षित चेहरे आहेत. आरपीआयचे अविनाश महातेकर सध्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. तरीही मंत्री होऊन त्यांना सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदावर राहता येणार आहे.

यांना मिळणार डच्चू

दरम्यान, पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरीश अत्राम, यांनाही डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे सर्व मंत्री राजीनामे मुख्यमंत्री यांच्याकडे देतील, अशी चर्चा आहे.

शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. दोन्ही कॅबिनेट मंत्रिपदं असतील.  या पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांची नावं दिली आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांना तुर्त मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळताना दिसत नाही.

महायुतीसोबत असलेल्या आरपीआयला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. अविनाश महातेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी महातेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी रिघ लावली. मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती सक्षमपणे पार पाडेन, असे अविनाश महातेकर यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात या १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश, यांना डच्चू

ठरल्याप्रमाणे उद्धव अयोध्येत जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तारासाठी थांबणार की अयोध्येत जाणार, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. रविवारी अयोध्या दौऱ्यावर शिवसेनेचे १८ खासदारही असणार आहेत. हे सर्वजण रामजन्मभूमीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत.