'मला मारण्याचाही मॉरिसचा कट होता पण...'; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा धक्कादायक दावा

Abhishek Ghosalkar Murder Case Wife Tejasvee Ghosalkar Claim: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने धक्कादायक दावा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 20, 2024, 11:39 AM IST
'मला मारण्याचाही मॉरिसचा कट होता पण...'; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा धक्कादायक दावा title=
पत्रकारांशी बोलताना दिली माहिती

Abhishek Ghosalkar Murder Case Wife Tejasvee Ghosalkar Claim: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मंगळवारी (19 मार्च 2023) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये धक्कादायक आरोप केले आहेत. अभिषेक यांच्याबरोबरच आपल्यालाही जीवे मारण्याचा मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाईचा कट होता असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. ज्या साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी अभिषेक यांना बोलवण्यात आलं होतं, त्या कार्यक्रमाला मलाही घेऊन यावं असं मॉरिसकडून सांगण्यात आलेलं. अभिषेक यांनी मला याबद्दल कळवलं होतं. मात्र मला उशीर झाल्याने त्यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं. याचाच अर्थ मला मारण्याचाही कट होता, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. तेजस्वी घोसाळकर आणि त्यांचे सासरे तसेच अभिषेक यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी अभिषेक यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अन्य यंत्रणेकडे तपास सोपवण्याची करणार मागणी

अभिषेक घोसाळकरांच्या हत्याचे तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. आम्ही या तपासामध्ये जमा केलेली माहिती तपास यंत्रणा आणि पोलीस आयुक्तांना दिली आहे, असं तेजस्वी यांनी पत्रकारांना सांगितलं. हत्या झाली त्यावेळी त्या ठिकाणी मेहुल पारेख आणि अमरेंद्र मिश्राबरोबरच एका अज्ञात व्यक्तीचा वावर होता यासंदर्भात सखोल तपास करावा अशी मागणी आम्ही केलेली. मात्र यासंदर्भात आजपर्यंत पोलिसांनी सखोल तपास केलेला नाही, असा दावा तेजस्वी यांनी केला. या प्रकरणात तपास दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी घोसाळकर कुटुंबाकडून उच्च न्यायालयामध्ये रिट पीटीशन दाखल करुन केली जाणार असल्याचंही तेजस्वी यांनी सांगितलं. 

3 मंत्र्यांची नावं घेतली

याच पत्रकार परिषदेमध्ये विनोद घोसाळकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणानंतर केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करत सदर वक्तव्यांमुळे आपण दुखावलो गेल्याचं नमूद केलं. "जेव्हा अभिषेकची हत्या झाली त्यावेळी माननिय गृहमंत्र्यांकडे विरोधी पक्षाने या हत्येबद्दल तसेच महाराष्ट्रात वारंवार होणारे गोळीबार आणि त्याहून होणाऱ्या हत्येबरोबरच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याने राजीनाम्याची मागणी केली. ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते मला अतिशय दु:ख देणारं होतं. त्यांनी असं म्हटलं, 'गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का?' अशा प्रकारे ते बोलल्याची बातमी छापली आहे," असं म्हणत विनोद घोसाळकरांनी नाराजी व्यक्त केली. पुढे बोलताना घोसाळकर यांनी एकनाथ शिंदे गटातील नेते तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नेते उदय सामंत यांनी केलेल्या विधानाचा उल्लेख केला. "दुसरा एक मंत्री उदय सामंत यांनी त्यासंदर्भात वक्तव्य करताना म्हटलं, 'हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे.' याची साऱ्याची माझ्याकडे कात्रणं आहेत. मी आपल्याच वृत्तपत्रात या बातम्या वाचल्यात," असं विनोद घोसाळकर म्हणाले. "तिसरा मंत्री 'एकमेकांच्या भांडणातून गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार?' असं घोसाळकर म्हणाले. घोसाळकर यांनी केलेलं तिसरं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं.

नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

मी त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत

"मी ज्यांनी नावं घेतली त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे हे आ. हे माझ्या कुटुंबाला ओळखतात. अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास अंतीम टप्प्यातही नसताना अशाप्रकारचं भेदभाव करणारं वक्तव्य केल्याने आम्हाला असं वाटतं की तपास यंत्रणेवर पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे," असं घोसाळकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.