CBSE, ICSE निकालांनंतर SSC विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली

इतर बोर्डाचा निकाल वाढल्याने एसएसची बोर्डाच्या निकालाकडे लक्ष

Updated: May 8, 2019, 08:38 PM IST
CBSE, ICSE निकालांनंतर SSC विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली title=

दीपाली जगताप-पाटील, मुंबई : सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या निकालानंतर आता राज्य महामंडळाच्या म्हणजेच एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे. एसएससी बोर्डाचा निकाल वाढणार की घसरणार? एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल किती टक्के लागणार? याची चिंता आता दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना सतावत आहे. सीबीएसई दहीवीचा निकाल 91.10 % लागला आहे तर आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 98.54 टक्के टक्यांनी लागला असून 0.03% वाढला आहे. यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढलं आहे.

यंदा दिल्ली बोर्डाच्या या विद्यार्थ्यांचा निकाल वाढला आहे. 80, 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदाच्या अकरावी प्रवेशात जोरदार चुरस पहायला मिळेल. म्हणूनच आता राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजेच एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना चांगलंच टेंशन आलं आहे. या विद्यार्थ्यांची यंदा बदललेल्या अभ्यासक्रमाची तसंच बदललेल्या परीक्षा पद्धतीत पहिलीच परीक्षा दिली आहे. त्यात तोंडी परीक्षा शिक्षण विभागाकडून बंद करण्यात आल्याने सहज मिळणारे 20 गुणही विद्यार्थ्यांच्या हातातून गेले आहेत.

दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणा-या शिक्षकांनाही बोर्डाचा निकाल कमी लागण्याची शक्यता वाटते. सध्या दहावीच्या उत्तरपत्रिका तपासत असलेले शिक्षक विलास परब यांच्यानुसार, 'बदललेल्या अभ्यासक्ररम आणि तोंडी परीक्षा रद्द झाल्याचा परिणाम निकालात नक्की दिसून येईल. दिल्ली बोर्डाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे बायफोकल आणि कॉमर्स विभागातील प्रवेशावर परिणाम होईल असं दिसते.'

दहावीचे शिक्षक अनिल बोरणारे यांनी म्हटलं की, 'सध्या पेपर तपासताना संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण निकाल कमी लागेल अशी शक्यता अधिक वाटते आहे. विज्ञान विषयाच्या निकालात अधिक परिणाम होईल. ही परिस्थिती पाहता अकरावी प्रवेशात अधिक स्पर्धा दिसून येईल. ज्यामुळे अकरावी प्रवेशाच्या जागा वाढवाव्या लागणार असंच चित्र आहे. यंदा सीबीएसई बोर्डातून 16 लाख 4 हजार 428विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले तर राज्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 99% लागला आहे. तब्बल 2 लाख 25 हजार 143 विद्यार्थ्यांना 90 टक्याहून अधिक गुण मिळाले आहेत. तर आयसीएसई बोर्डातून राज्यातले 21 हजार 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

एसएससी बोर्डाचा निकाल अद्याप लागला नसून यंदा तब्बल 17 लाख 813 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तम गुणांच्या तुलनेत प्रवेशाच्या जागा कमी असून त्यातही चाॆगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये यंदा स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. शिवाय नव्याने लागू झालेल्या आरक्षणाचा फॅक्टरही यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रीयेत महत्वाचा ठरणार आहे. एका बाजूला आरक्षणाअंतर्गत काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात लाखो विद्यार्थ्यांसमोर हवं ते महाविद्यालय प्रवेश घेण्याचे आव्हान असेल.