डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत लोकल ट्रेनचं तिकीट? नव्या वादाला फुटलं तोंड

Dombivali Central Railway Ticket In Gujrati: सोशल मीडियावर या तिकीटाचा फोटो व्हायरल झाला असून सदर तिकीट 6 मार्च रोजी छापण्यात आल्याचं तिकीटावर नमूद करण्यात आलं आहे. अनेकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. मात्र या दाव्याला विरोध करणारेही अनेकजण आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 14, 2024, 09:00 AM IST
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत लोकल ट्रेनचं तिकीट? नव्या वादाला फुटलं तोंड title=
या तिकीटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Dombivali Central Railway Ticket In Gujrati: मध्य रेल्वे तशी उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन, प्रवाशांची गर्दी यासारख्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. मात्र डोंबिवली स्ठानकावरील एका गोंधळामुळे सध्या मध्य रेल्वे चर्चेत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये छापण्यात आलेलं रेल्वेचं तिकीट गुजराती भाषेत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. डोंबिवली ते घाटकोपरदरम्यानचे हे तिकीट आहे. हे तिकीट 6 मार्च रोजी छापण्यात आल्याची नोंद त्यावर आहे. मात्र प्रिंटरमध्ये बिघाड झाल्याने तिकीटाची अशी प्रत छापून आली आहे असा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या तिकीटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर चर्चा

डोंबिवली स्थानकावर छापण्यात आलेल्या या तिकीटावर इंग्रजी खाली चक्क गुजराती भाषेत डोंबिवली ते घाटकोपरच्या दिशेने साधारण तिकीट हा मजकूर छापण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या तिकीटाचा फोटो व्हायरल झाला असून अनेकांनी घडलेला हा प्रकार फारच धक्कादायक असल्याचं म्हटलंय. या तिकीटासंदर्भात सोशल मीडियावर काय चर्चा आहे पाहूयात...

विजय नकासे यांनी, "शप्पथ तुम्हाला संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्मांची महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याची स्वप्ने पाहणारे या राज्यात पुन्हा राजकीय पटलावर दिसता कामा नयेत. जागा हो मराठी माणसा," असं म्हणत हे तिकीट शेअर केलं आहे.

तर योगेश सावंत यांनी, गुजरातीमध्ये लोकलचे तिकीट? असं म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे.

तर विलास नावाच्या एका युझरने विजय नकासेंना डोंबिवली हे तिकीटावर लिहिल्याप्रमाणे गुजरातीमध्ये लिहिलं जात नाही असं म्हटलं आहे. "परत पुन्हा फेक ट्वीट. विजय नकासेंनी डोळ्यांच्या दवाखान्यात डोळे तपासून घ्या. नंतर गुजरात लेखन वाचनाचे शिक्षण घ्या. रेल्वे तिकीटामध्ये कुठेही गुजराती शब्दाचा उल्लेख नाही. 'डोंबिवली घाटकोपर' हिंदी, इंग्रजी आणि मराठीमध्ये लिहिले आहे. गुजरातीमध्ये 'ડોમ્બિવલી ઘાટકોપર' असं लिहितात," अशी पोस्ट विलास यांनी केली आहे.

तर पियुष कश्यप यांनी तिकिटावरील कथीत गुजराती शब्द खरोखरच कसे लिहिले जातात हे सांगितलं आहे. "हे तिकीट गुजराती भाषेत आहे? डोंबीवली - ડોમ્બિવલી, घाटकोपर - ઘાટકોપર, साधारण - સાધારણ... तुमच्या माहितीसाठी, गुजरातीमध्ये दिलेले शब्द कसे लिहतात ते दिलंय. उगाच राजकारणासाठी खोटा नरेटिव्ह तयार करू नका. सामान्य जनता हुशार आहे तुमच्या नरेटिव्हला बळी पडणारी नाही," असं कश्यप म्हणाले आहेत.

राजकीय वाद

सदर तिकीटावरुन राजकीय वादही सुरु झाला आहे. डोंबिवलीमधील वेगवेगल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील या तिकीटासंदर्भातील प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीचे समर्थक सदर तिकीट गुजराती भाषेत नसल्याचा दावा करताना दिसत आहेत. प्रिटींग मशीनमध्ये बिघाड झाल्याने हे तिकीट छापलं गेल्याचा रेल्वेचा दावा आहे. प्रिंटरमधील दोषामुळे मराठीमधील छपाई गुजराती भाषेसारखी दिसत असल्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा असला तरी अनेकांना हे स्पष्टीकरण पटलेलं नाही.