सूर्योदय फाऊंडेशनची कौतुकास्पद कामगिरी; राज्यपालांनी एचआयव्हीबाधित मुलांसाठी केली मोठी घोषणा

‘एचआयव्ही’बाधित मुलांसाठी पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरोद्‌गार राज्यपालांनी काढले

Updated: Aug 23, 2022, 09:52 PM IST
सूर्योदय फाऊंडेशनची कौतुकास्पद कामगिरी; राज्यपालांनी एचआयव्हीबाधित मुलांसाठी केली मोठी घोषणा title=

लातूर औसा येथील ‘सेवालय बालगृह’ या संस्थेने ‘एचआयव्ही’ (HIV) बाधित मुलांसाठी बांधलेल्या वसतिगृह इमारतीचे अनावरण राज्यपाल कोश्यारी (Governor bhagat singh koshyari) यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले.  यावेळी बोलताना प्रत्येकाने किमान एका गरजू व्यक्तीला तरी जीवनात मदत केली पाहिजे असं राज्यपाल म्हणाले.

दु:खी व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे. निराश्रित व्यक्तीची सेवा करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास मदत करण्याचा गुण मनुष्याला मिळाला आहे. त्याचा वापर करून प्रत्येकाने किमान एका गरजू व्यक्तीला तरी जीवनात मदत केली पाहिजे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले.

या कार्यक्रमाला पार्श्वगायिका तसेच सूर्योदय फाउंडेशनच्या (Suryodaya Foundation) संस्थापिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal), एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी व प्रवीण छेडा, ‘सेवालय’चे संस्थापक रवी बापटले यांसह सेवालय संस्थेतील निवासी एचआयव्ही बाधित मुले उपस्थित होती. यावेळी सेवालय संस्थेच्या ‘हॅपी इंडियन व्हिलेज’(एचआयव्ही) या उपक्रमाचे कौतुक करून राज्यपालांनी संस्थेला दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

यावेळी एचआयव्ही बाधित मुलांनी सादर केलेले सीमेवरील जवानांचा जीवनपट दाखविणारे लघुनाट्य सादर केले. या मुलांचेही कौतुक करताना राज्यपालांसह सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.

सूर्योदय फाऊंडेशनचे राज्यपालांकडून कौतुक

यावेळी ‘एचआयव्ही’बाधित मुलांसाठी पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरोद्‌गार राज्यपालांनी काढले. सूर्योदय फाउंडेशन तसेच एम्पथी फाउंडेशन या संस्थांच्या आर्थिक सहकार्याने सेवालय बालगृहाच्या वसतिगृहाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी कविता पौडवाल यांनी सूर्योदय फाउंडेशन तसेच सुगल व दमाणी उद्योग समूहाच्या एम्पथी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली.

सूर्योदय फाऊंडेशनची स्थापना पद्मश्री डॉ अनुराधा पौडवाल यांनी केली आहे. याद्ववारे एचआयव्ही बाधित रूग्णांची सेवा करण्यात येत असून त्याला हॅप्पी इंडियन व्हिलेज असेही म्हणतात. सध्या ही संस्था एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या १०० हून अधिक मुलांची काळजी घेत आहे. 

दरम्यान, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, एम्पथी फाउंडेशनचे प्रवीण भाई आणि श्री रवि भारती यांच्या संयुक्त प्रयत्नाने, सूर्योदय फाउंडेशन महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांची अथक सेवा करत आहेत.