टेस्ट न करता कोरोनाचा निगेटीव्ह रिपोर्ट, पोलिसांनी असा रचला सापळा

 पैसे देऊन बनावट रिपोर्ट 

Updated: Apr 15, 2021, 01:43 PM IST
टेस्ट न करता कोरोनाचा निगेटीव्ह रिपोर्ट, पोलिसांनी असा रचला सापळा title=

भाईंदर : सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागलाय. दरम्यान सरकारी कार्यालय आणि अनेक ठिकाणी कोरोना चाचणी रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलाय. राज्या अंतर्गत प्रवासासाठी कोरोना अहवाल गरजेचा आहे. अहवाल पॉझिटीव्ह आल्यास नियोजित कार्यक्रमात भाग घेता येणार नाही म्हणून अनेकजण पैसे देऊन बनावट रिपोर्ट काढत आहेत. अशा बनावट रिपोर्ट देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 

कोरोनाचा बनावट रिपोर्ट बनवून देणारा लॅब टेक्निशियन पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. मीरारोडमध्ये कोरोनाचा बनावट निगेटिव्ह बनवून देणाऱ्या एका लॅब टेक्निशियनला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. 

कृष्णा रामदुलार सरोज असं पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नागरिकांना प्रवासासाठी लागणारा कोरोनाचा रिपोर्ट कोणतीही टेस्ट न करता देत होता. यासाठी प्रत्येक रिपोर्टमागे तो एक हजार रुपये घेत होता.

या व्यक्तीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे सहा जणांना ग्राहक म्हणून पाठवले. आपल्याला निगेटीव्ह रिपोर्ट हवे असल्याचे त्यांनी आरोपी कृष्णा सरोजला सांगितले. त्यानंतर आरोपीने चार तासांत रिपार्ट तयार करून पाठवले. मात्र रिपोर्टचे सहा हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि अटक केली.