सरकार हिंदू विरोधी, प्रत्येकवेळी संयमाची, सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का? राम कदम यांचा सवाल

राज्य सरकारने हिंदू बांधवांची फसवणूक केली असून आम्ही थाटामाटात दहीहंडी साजरी करणार असा इशारा राम कदम यांनी दिला आहे

Updated: Aug 23, 2021, 05:07 PM IST
सरकार हिंदू विरोधी, प्रत्येकवेळी संयमाची, सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का? राम कदम यांचा सवाल title=

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षीही राज् सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. 

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारच्या दहीहंडी उत्सव रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. 'आरोग्य धोक्यात घालून सण साजरा करा, असं हिंदू बांधवांचं कधीही म्हणणं नाही, आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची, सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का? असं सांगत राम कदम यांनी हे सरकार हिंदू विरोधी असल्याची टीका केली आहे. 

महाराष्ट्र सरकारने दहीहंडी आयोजक म्हणून आमच्या मंडळाला बैठकीला बोलावलं नाही, सरकारला समर्थन करणारे आमदार आणि मंडळं बोलावली, त्यामुळे ते सरकारच्या निर्णयाला विरोध कसा करणार, असा आरोप करत राम कदम यांनी हे सरकार एअर कंडिशनमध्ये बसून राज्य करणारं सरकार असल्याचीही टीका केली आहे.

आजची बैठक ही धूळफेक करणारी होती, दहीहंडी आयोजक या नात्याने श्रीकृष्ण उत्सव साजरा करणार, सरकारने विरोध केला तरी घाटकोपरला शंभर टक्के दहीहंडी साजरी करणार असा इशारा राम कदम यांनी दिला आहे. नियम लावून दहीहंडी साजरी करायला परवानगी द्यावी अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे. 

बियर बार उघडण्यासाठी नियम लावले आहेत, मग मंदिरं उघडायला नियम का लावत नाही, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. आम्ही मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं तर खटले भरले, माझ्या घराबाहेर एक हजार पोलिसांचा फाटा तैनात करण्यात आला होता, मी काही अतिरेकी नाही, मी मंदिरात जाणार होतो असं राम कदम यांनी म्हटलं आहे.