'भाजपने चार जागांपैकी एक जागा आरपीआयला द्यावी'

रामदास आठवलेंची मागणी 

Updated: May 4, 2020, 03:55 PM IST
'भाजपने चार जागांपैकी एक जागा आरपीआयला द्यावी' title=

मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या  २१ मे रोजी  निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. यावरून आता भाजप आणि रिपाईमध्ये जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला. एक जागा रिपाईला देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी भाज चार जागांवर निवडणूक लढवत आहे.  ज्या ४ जागा  भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र्र अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे रामदास आठवले चर्चा करणार आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणूकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेकडून दोन नाव निश्चित करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चि करण्यात आले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठीच्या निवडणुकीला परवानगी दिली. त्यामुळे आता यापैकी एका जागेवर निवडणूक लढवून उद्धव ठाकरे आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ मे पूर्वी या निवडणुका व्हाव्यात, असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही निवडणूक घेत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरनाबाबतच्या इतर सगळी काळजी घेणे बंधनकारक असेल.